३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. मधल्या फळीतला भारताचा महत्वाचा खेळाडू केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त ठरला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने आयपीएलमधून माघारही घेतली होती.

मात्र टीम इंडियाचे फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फरहात यांनी केदारची दुखापत फारशी गंभीर नसून तो विश्वचषकाआधी बरा होईल असं म्हटलं होतं. त्यानुसार केदारच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पॅट्रीक फरहात यांनी बीसीसीआयला आपला अहवाल सादर केल्याचं कळतंय. यामुळे केदार जाधव टीम इंडियासोबत २२ मे ला इंग्लंडसाठी रवाना होऊ शकणार आहे.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केदार काही दिवस वास्तव्याला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येखील प्रशिक्षण केंद्रात केदारने पॅट्रीक फरहात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी फिटनेस टेस्ट पास करत विश्वचषकासाठी आपलं नाव पक्क केलं. केदारच्या अनुपस्थितीत अंबाती रायुडू-अक्षर पटेल यांची नाव चर्चेत होती.

गेल्या काही वर्षात केदारने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा पक्की केली होती. केदारने आतापर्यंत ५९ वन-डे सामन्यांमध्ये ११७४ धावा केल्या आहेत. ४३-५० च्या सरासरीने केदारने आतापर्यंत दोन शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. याचसोबत केदार जाधवने आतापर्यंत २७ बळी घेत, अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या स्पर्धेत केदार कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader