केदार जाधवचे शतक व त्याने पुष्कराज चव्हाण याच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला आसामविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ८ बाद ३४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
जाधवने संग्राम अतितकर (४६) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भर घातली तर चव्हाण (६५) याच्यासह चौथ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. जाधवने शानदार १२८ धावा केल्या.
आसामचा कर्णधार अबू नेचीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार रोहित मोटवानी (२) व हर्षद खडीवाले (२४) यांना महाराष्ट्राने लवकर गमावले. परंतु अतितकर व जाधव यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत संघाचा डाव सावरला. अतितकरने सात चौकारांसह ४६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या चव्हाणने जाधवला चांगली साथ दिली. त्यांनी संघाचा अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला. जाधवने १४८ चेंडूंमध्ये १२८ धावा करताना १९ चौकार मारले. त्याचे हे या मोसमातील चौथे शतक आहे. या मोसमातील रणजी सामन्यांमध्ये त्याने एक द्विशतक, तीन शतकांसह सातशेहून अधिक धावा केल्या आहेत. चव्हाणने ९४ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ६५ धावा केल्या.
ही जोडी फुटल्यानंतर महाराष्ट्राचा डाव घसरला. त्यांनी चिराग खुराणा (१५), श्रीकांत मुंढे (६), अक्षय दरेकर (९) यांच्याही विकेट्स गमावल्या. एका बाजूने संयमाने खेळ करीत अंकित बावणे याने नाबाद ३६ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी अनुपम सकलेचा (नाबाद १) हा त्याच्या साथीत खेळत होता. आसामकडून महंमद सय्यद याने तीन बळी घेतले तर अरुप दासने दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ९० षटकांत ८ बाद ३४३ (संग्राम अतितकर ४६, केदार जाधव १२८, पुष्कराज चव्हाण ६५, अंकित बावणे खेळत आहे ३६; अरुप दास २/७६, महंमद सय्यद ३/८५)