आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेला चेन्नई सुपरकिंग्ज संघ सध्या वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. सर्वात प्रथम संघातले दोन खेळाडू करोनाबाधित आढळल्यामुळे एकच खळबळ माजली. यानंतर संघातील महत्वाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा सुरु होण्याआधीच रैनाने माघार घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. चेन्नई सुपरकिंग्जचे सर्वेसर्वा एन.श्रीनीवासन यांनीही रैनाने अचानक माघार घेतल्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत, रैनाला याचा पश्चाताप होईल असं सांगितलं आहे.
अवश्य पाहा – CSK चा स्वदेशीचा नारा, युएईत ताज हॉटेलमध्ये थांबणार संघ…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघातील दोन खेळाडूंना झालेली करोनाची लागण आणि हॉटेलमध्ये मनासारखी रुम न मिळाल्याने रैना नाराज होता. यामधून झालेल्या वादातून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. २९ ऑगस्ट रोजी रैनाने माघार घेतल्याच्या वृत्ताला CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दुजोरा दिला. या घडामोडींनंतर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने आपल्या ट्विटर हँडलवर एक सूचक ट्विट करत नाव न घेता रैनाला टोला लगावला आहे.
On the path of excellence – you find 1000 excuses to let go, but only 1 reason to hold on.
The choice is YOURS ! pic.twitter.com/PLx4iyem0A
— IamKedar (@JadhavKedar) August 29, 2020
यशाचा मार्ग सोडण्यासाठी तुम्हाला हजार कारणं मिळतात, पण तो मार्ग कायम राखण्यासाठी केवळ एक कारण पुरेसं असतं. यापैकी कोणाची निवड करायची हा निर्णय तुमचा असतो…अशा शब्दांमध्ये केदार जाधवने नाव न घेता संघातील नाराजीनाट्यावर रैनाला टोला लगावला आहे.