पुणे : मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवने पुनरागमन करताना झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीने रणजी करंडक स्पर्धेत ब -गटात महाराष्ट्राला आसामविरुद्ध आपली बाजू भक्कम करता आली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस महाराष्ट्राने ८७ षटकांत २ बाद ३०७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा केदार जाधव १४२, तर सिद्धेश वीर ९४ धावांवर खेळत होता. त्यापूर्वी, आसामचा लांबलेला पहिला डाव गुरुवारी अवघ्या एका धावेची भर घालून २७५ धावसंख्येवर संपुष्टात आला.
आसामचा डाव झटपट गुंडाळण्याची संधी पहिल्या दिवशी महाराष्ट्राने गमावली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर चार चेंडूंतच आसामचा डाव गुंडाळण्याची औपचारिकता पूर्ण केल्यावर संपूर्ण दिवस महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. अम्बी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावरील फलंदाजीला साथ मिळणाऱ्या खेळपट्टीवर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी मुक्तपणे फलंदाजी केली. सिद्धेश वीर आणि केदार जाधव यांनी तिसऱ्या गडय़ासाठी २१२ धावांची नाबाद भागीदारी केली. त्यापूर्वी, सिद्धेशने नौशादच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या.