आयपीएल प्रमुख शुक्ला यांची सूचना
राजकारण क्रिकेटपासून दूर ठेवा, अशी सूचना आयपीएलप्रमुख राजीव शुक्ला यांनी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) मात्र त्यांच्या सरकारने परवानगी दिली आहे.
‘‘सरकार आम्हाला क्रिकेट मालिकेसाठी परवानगी देईल अशी आम्हाला आशा आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळ श्रीलंकेत खेळण्यासाठी राजी आहेत. दोन देशांतील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात, हा प्रमुख हेतू आहे,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
‘‘पहिल्या दिवसापासून मी, क्रिकेट आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये, असे सांगत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना वातावरण प्रतिकुल होते, परंतु तरीही त्यांनी क्रिकेट मालिकांना परवानगी दिली होती. आपण भारतीय संघ पाकिस्तानला पाठवला होता. आपण पाकिस्तानसोबत खेळावे,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरू होण्याची नितांत आवश्यकता आहे. दोन्ही सरकारने परवानगी दिल्यास ती कोणत्या ठिकाणी खेळवण्यात येईल, हे दुय्यम स्थानी असेल.
– वसिम अक्रम,
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज