Gautam Gambhir on Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने स्टार फलंदाज विराट कोहलीच्या श्रीलंकेतील कँडी येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक सामन्यादरम्यान खराब शॉट निवडल्याबद्दल टीका केली. तसेच, सामन्यादरम्यान खेळाडूंच्या मैत्रीपूर्ण वृत्तीवर देखील नाराजी व्यक्त केली. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झाला होता, मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला होता. मात्र, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली.
कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने त्याच्या सिग्नेचर कव्हर ड्राइव्हने सुरुवात केली आणि तो पाकिस्तानविरुद्ध आणखी एक शानदार खेळी खेळेल असे वाटत होते. पण तो लवकरच शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. कोहलीने पॉइंट आणि गलीच्या मधून थर्ड मॅनच्या दिशेन चेंडू ग्लान्स करून एकेरी- दुहेरी धाव काढण्यासाठी शॉट खेळला. त्यावेळी कोहलीच्या बॅटच्या आतील भागास चेंडू लागला आणि थेट स्टंपवर जाऊन आदळला आणि तो ७ चेंडूत केवळ ४ धावा करून बाद झाला.”
विराटने खेळलेला फटका ‘झिरो शॉट’ असल्याचे सांगत गंभीरने विराटवर टीका केली. स्टार स्पोर्ट्सवर गंभीर बोलताना म्हणाला, “हा काय शॉट आहे, ना पुढे, ना मागे. मला वाटते की एका धावेसाठी ही जोखीम घेणे वरिष्ठ खेळाडूला तेही संघ अडचणीत असताना ही कितपत शोभते. माझ्यामते हे सुसाईड करण्यासारखे होते. शाहीन आफ्रिदीसारख्या खेळाडूसमोर तुम्ही असे खराब फटका खेळता, मला फार वाईट वाटले. ना पुढे जायचे की मागे जायचे हे तुम्हाला माहीतच नव्हते.” तो पुढे म्हणाला, “रोहित थोडा दुर्दैवी होता. चेंडू बॅटला आतील काठाने आदळला नाही आणि कदाचित थोडा खाली राहिला. पण त्याला टाकलेल्या चेंडूची लेंथ बदलण्याचे श्रेय शाहीन शाह आफ्रिदीला जाते.”
खेळाडूंच्या मैत्रीपूर्ण वृत्तीवर गंभीरने व्यक्त केली नाराजी
या हायव्होल्टेज मॅचपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचे एकत्र हसतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, खेळाडूंच्या या मैत्रीपूर्ण वृत्तीचे अनेकांनी कौतुकही केले होते. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मैदानात मित्रांप्रमाणे भेटताना पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरला आनंद झाला नसला तरी त्याने यामागचे कारणही सांगितले आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे नेहमीच प्रतिस्पर्धी मानले जातात, पण या दोन देशांच्या खेळाडूंमध्ये चांगले संबंध निर्माण झाले आहेत, त्याचेच प्रतीक होते कोहली आणि रौफ यांची भेट. माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला की, “क्रिकेटपटूंनी मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंसोबत सामन्यात खूप मैत्रीपूर्ण वृत्ती अंगीकारली आहे.”
स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात गौतम गंभीर म्हणाला, “जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुम्ही तुमची दोस्ती-यारी मैदान ही बाहेर सोडून आली पाहिजे. सामन्यात तुम्ही थोडा जोश दाखवणे महत्त्वाचे आहे, मैत्री बाहेरच असावी. दोन्ही बाजूंच्या खेळाडूंच्या नजरेत आक्रमकता असावी. सहा-सात तासांच्या क्रिकेटनंतर तुम्हाला हवी तेवढी मैत्री करता येईल. ते तास खूप महत्वाचे आहेत, कारण तुम्ही फक्त स्वतःचे प्रतिनिधित्व करत नाही, तर तुम्ही एक अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहात.”
गंभीर पुढे म्हणाला, “आजकाल विरोधी संघाचे खेळाडू मैदानावर एकमेकांची चेष्टा करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी तुम्ही हे सर्व पाहिले नव्हते. तू फक्त एक मैत्रीपूर्ण सामना खेळत आहेस, असे वाटते” गौतम गंभीरने २०१०च्या आशिया चषकात कामरान अकमलशी झालेल्या संघर्षाबद्दल विचारले असता त्याने ही प्रतिक्रिया दिली, जिथे एम.एस. धोनीने त्याला बाजूला नेले होते.