खो खो खेळाची लोकप्रियता संपत चालली आहे अशी टीका करणाऱ्यांना बारामती राष्ट्रीय स्पर्धेद्वारे चोख उत्तर दिले आहे, असाच प्रत्यय येत आहे. दररोज किमान दहा हजार प्रेक्षक या खेळाचा आनंद घेताना दिसून आले. खो खो खेळावर प्रेम करणाऱ्यांचा उत्साह टिकविण्याचे आणि पर्यायाने या खेळात आधुनिकता आणण्याचेच आव्हान संघटकांपुढे आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात कडक उन्हाला न जुमानता दहा हजार प्रेक्षक उपांत्य व तिसऱ्या क्रमांकांच्या लढतीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. अंतिम सामन्यासाठी ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. केवळ बारामतीच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरच्या अनेक खो खो चाहत्यांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांमधून काही ज्येष्ठ खेळाडूंचा त्यामध्ये समावेश होता.
कुस्ती स्पर्धेत एखाद्या मल्लाने निकाली कुस्ती मारल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षांव होतो, त्याप्रमाणे येथेही खेळाडूंवर पारितोषिकांचा वर्षांव करणारे प्रेक्षक होते. लागोपाठ दोन सामन्यांमध्ये नऊ मिनिटे पळतीचा खेळ केल्यानंतर व्ही. दिव्या हिला येथील ग्रामीण भागांतील तीन-चार प्रेक्षकांनी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देत तिचे कौतुक केले.
क्रिकेट किंवा हॉकी सामन्यांचे सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूची माहिती मोठय़ा पडद्यावर दाखविली जाते, तसेच येथे खो-खो स्पर्धेतही प्रेक्षकांना अंतिम लढतीमधील दोन्ही संघांमधील खेळाडूंची छबी व त्याचे नाव मोठय़ा पडद्यावर दाखविले गेले. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देणे त्यांना सुकर झाले. पुण्या-मुंबईत क्लबतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धामध्ये संगणकाच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिक धावफलकाचा आवर्जून उपयोग केला जातो. तसा उपयोग येथे झाला असता तर प्रेक्षकांना अंतिम सामन्यांचा अधिक आनंद घेता आला असता.
केवळ खो खोच्या प्रेमापोटी!
ही स्पर्धा ज्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आयोजित केली जात आहे, त्या संस्थेत शिकणारे अनेक मुले-मुली येथे हौसेने स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. हा खेळ ते खेळत नसले तरी खो खो पाहायला आवडते, म्हणूनच आम्ही स्पर्धेसाठी मदत करीत आहोत, असे या मुलांनी सांगितले.
महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्रच!
पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा प्रतिस्पर्धी असलेल्या रेल्वे संघातील बारा खेळाडूंपैकी दहा खेळाडू महाराष्ट्राचे असल्यामुळे खऱ्या अर्थाने हा सामना महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र असाच खेळला गेला. उपांत्य लढतीत महाराष्ट्राने आपला छोटा भाऊ असलेल्या कोल्हापूरला हरवले. राज्य खो-खो संघटनेच्या स्थापनेपासून असलेल्या कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या मोठय़ा भावाला चांगली झुंज दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा