इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, यष्टिरक्षक मॅट प्रायर आणि अ‍ॅलिस्टर कुक यांच्याबद्दल आपल्या आत्मचरित्रात काही आरोप केल्याबद्दल केव्हिन पीटरसन याच्यावर इंग्लंडचे ज्येष्ठ क्रिकेटपटू ग्रॅहम गूच यांनी टीका केली आहे.
गूच यांनी म्हटले आहे, ‘‘पीटरसन हा अनेक वेळा संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू ठरला आहे. मात्र त्याने संघातील अन्य खेळाडूंबद्दल व प्रशिक्षकांवर केलेल्या आरोपांशी मी अजिबात सहमत नाही. फ्लॉवर यांच्याविषयी केव्हिनने केलेले आरोप अतिशय चुकीचे आहेत. फ्लॉवर यांनी इंग्लंड संघासाठी केलेले योगदान मोठे आहे. त्यांनी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना खेळाचा अतिशय सखोल अभ्यास आहे. त्यांनी खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी अमलात आणलेल्या योजना संघासाठी फायदेशीर ठरल्या आहेत.’’
‘‘दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस याला संदेश पाठविल्याबद्दल केव्हिनला २०१२मध्ये संघातून वगळले होते. त्या वेळी फ्लॉवर यांनी संघ व्यवस्थापन व केव्हिन यांच्यात समन्वय साधला होता,’’ असेही गूच यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘केव्हिनने केलेल्या आरोपांबद्दल संबंधित खेळाडूंनी मौन पाळावे अशी सूचना इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने केली असेल. मात्र आता हे मौन सोडून खेळाडूंनी केव्हिनच्या टीकेला योग्य उत्तर देण्याची वेळ आली आहे. अ‍ॅशेस मालिका सुरू असताना ग्रॅमी स्वानने निवृत्त होण्याचा आकस्मिक निर्णय घेतला. हा निर्णय मला मान्य नव्हता. केव्हिनने प्रायर हा संघासाठी योग्य खेळाडू नसल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र या मताशी मी सहमत नाही. प्रायर हा इंग्लंडच्या संघाचा एक महत्त्वाचा घटक आहे.’’
 

Story img Loader