तुमच्यामध्ये फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर त्याच्या जोडीला जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि विजिगीषुवृत्तीही असायला लागते, तरच तुम्ही तुम्हाला सिद्ध करू शकता. जात, पात, धर्म, वर्ण यांसारखी भेदक वाटणारी व्यवस्थाही तुम्हाला अडवू शकत नाही, त्यांना छेद देत तुम्ही पुढे जाऊ शकता. हा प्रवास फार खडतर, कठीण असतो, त्या वेळी साथ किंवा पाठिंबा द्यायलाही जास्त कुणी नसते. सोन्याला जसे शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावे लागते, तशीच प्रक्रिया घडत असते. पण हे सारे दिव्य, अडथळे, अडचणी, प्रश्न, समस्या सोडवत जेव्हा तुम्ही प्रकाशझोतात येता तेव्हा मात्र सारेजण तुमचे गोडवे गाण्यात रममाण असतात, असेच काहीसे घडले ते केव्हिन पीटरसनच्या बाबतीतही. इंग्लंडच्या संघाने त्याला आगामी मालिकांसाठी वगळले आणि कुणाची सहानुभूती नको म्हणून त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. पीटरसनची कारकीर्द चांगलीच गाजली, ती त्याच्या आयुष्यातील अनेक नाटय़पूर्ण क्षणांमुळे. तोही स्वभावाने मानी व अहंकारी. त्यामुळेच पीटरसन आणि वादांचे सख्यच.
‘केपी’ मुळात दक्षिण आफ्रिकेतील. लहानपणापासून क्रिकेटचे प्रेम त्याने जोपासले होते. त्यामुळे चांगले क्रिकेट खेळायलाही लागला. पण वर्णभेदामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होत राहिले. ही गोष्ट त्याची आई समजून चुकली आणि त्यांनी केपीच्या क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी इंग्लंड गाठले. इंग्लंडचे क्रिकेट म्हणजे तंत्रशुद्ध, पण त्यामध्येही रांगडा केव्हिन उठून दिसला. तो तसा तंत्रशुद्ध फलंदाज नव्हताच, पण त्याचे फटके मात्र जोरकस होते, गोलंदाजांची भंबेरी उडवणारे होते. २००१ साली तो आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये आला. नॉटिंगहॅम्पशायरकडून खेळायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी त्याने चार शतकांसह १२०० धावांचा पाऊस पाडला. तो संघाचा एक अविभाज्य भाग होऊ पाहत होता. पण २००३मध्ये त्याचे संघाचा कर्णधार जेसन गॅलियनबरोबर कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण एवढे कडाक्याचे होते की, ते बॅट फोडण्यापर्यंत पोहोचले. सुदैवाने खेळाडूंनी सावरल्यामुळे डोकी फुटली नाहीत. नॉटिंगहॅम्पशायरला सोडचिठ्ठी देत त्याने हॅम्पशायरला खेळायला सुरुवात केली आणि दमदार कामगिरीच्या जोरावर त्याच्यासाठी इंग्लंडच्या संघाचे दरवाजे खुले झाले. मग झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे २००४ साली त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यानंतर इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला आणि तिथे खऱ्या अर्थाने त्याच्या मनातला खदखदत असलेला राग धावांच्या रूपात निघाला. या एकदिवसीय मालिकेत त्याने तीन शतके लगावत आपल्यातील गुणवत्ता ज्यांनी नाकारले त्यांच्या नाकावर टिच्चून सिद्ध केली. २००५मध्ये अॅशेस मालिकेत क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या वेळी मॅकग्रा, गिलेस्पी, ब्रेट ली आणि शेन वॉर्न या चौघांच्या गोलंदाजीचा प्रतिकार करत इंग्लंडकडून दोन्ही डावांत सर्वाधिक धावा केल्या आणि त्या जोरावर इंग्लंडला ही कसोटी अनिर्णीत राखता आली. २००६मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये विवियन रिचर्ड्स यांचा जलद एक हजार धावांचा विक्रम त्याने मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्येही पहिल्या २५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये त्याचा सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो. २०१० साली इंग्लंडने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, त्यामध्ये केव्हिनची मोलाची भूमिका होती. त्याच वर्षीची अॅशेस मालिका असो किंवा एकदिवसीय मालिका, तो संघासाठी जिवाचे रान करत एकामागून एक यशाची शिखरे चढत होता, संघाचा अविभाज्य घटक होत होता. इंग्लंडचे कर्णधारपदही त्याला देण्यात आले, पण त्याला ते राखता आले नाही. २००९साली त्याचे आणि प्रशिक्षक पीटर मूर्स यांचे कडाक्याचे भांडण झाले आणि केपी आपले कर्णधारपद गमावून बसला. मैदानावर तो जेवढा रांगडा होता त्यापेक्षाही जास्त मैदानाबाहेर अवली होता. त्याचाच फटका त्याला बऱ्याचदा बसला. मग ते नाइट क्लब्समधली मारामारी असो, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला मोबाइलद्वारे संदेश पाठवणे असो, अॅशेसदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणे असो, इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक निक नाइट याची ‘ट्विटर’वरून निंदा करणे असो किंवा अॅशेस जिंकल्यावर मैदानातच बीअर पिऊन लघुशंका करणे असो, अशा नानाविध प्रकरणांमध्ये त्याचा पाय रुतत गेला.
काही महिन्यांपूर्वी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात अॅशेस खेळायला दाखल झाला आणि चारीमुंडय़ा चीत झाला. या मानहानीकारक पराभवाचे पहिले बळी इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर ठरले. त्यानंतरचा बळी गेला तो केपीचा. आगामी वेस्ट इंडिज दौरा आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी केपीला वगळण्यात आले. हे सारे सहन न झाल्याने केपीने निवृत्तीचा निर्णय घेतला.
उंचपुरा, गोरापान, मजबूत बांधा, रुबाबदार, ‘अरे ला, कारे’ म्हणून जाब विचारणारा असा ‘केपी’ जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा साऱ्यांचेच लक्ष वेधून घ्यायचा. टेनिस क्रिकेटमधल्या शैलीत जेव्हा तो फलंदाजीसाठी उभा राहायचा तेव्हा मात्र गोलंदाजांना घाम फुटायचा. कारण त्याच्यासारखा तडाखेबंद, धडाकेबाज फलंदाज इंग्लंडकडे या काळात नव्हताच. मैदानात क्रिकेटला अलविदा करण्याचे स्वप्न त्याचेही भंगलेच, पण तरीही तो नेहमीच दर्दी क्रिकेटरसिकांच्या मनात नेहमीच आपल्या चांगल्या-वाईट आठवणींमुळे रुंजी घालत राहील. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट तो खेळणार नसला तरी त्याचा जलवा आयपीएलमध्ये नक्कीच पाहता येईल.
पीटरसनच्या कारकिर्दीचा आढावा
कसोटी क्रिकेट
सामने धावा सरासरी शतके अर्धशतके
१०४ ८१८१ ४७.२८ २३ ३५
एकदिवसीय क्रिकेट
सामने धावा सरासरी शतके अर्धशतके
१३६ ४४४० ४०.७३ ९ २५