एमएस धोनीचे चाहते धोनीची एक व्हिडीओ क्लिप नेहमी शेअर करत असतात. ही क्लिप २०१६ मधल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समधल्या आयपीएल सामन्यातली आहे. तेव्हा धोनीमुळे जगाला समजलं की, केविन पीटरसन हा त्याचा कसोटी क्रिकेटमधला पहिला बळी होता. मुबंई विरुद्ध पुणे सामन्यात पुण्याची गोलंदाजी सुरू होती. पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यष्टीमागे उभा होता. त्याच्या शेजारी मनोज तिवारी क्षेत्ररक्षण करत होता. तर केविन पीटरसन या सामन्याचं समालोचन करत होता. सामन्यादरम्यान, पीटरसन मनोज तिवारीशी इयरफोन्सद्वारे (इयरपिस) बोलत होता. तेव्हा पीटरसन मनोजला म्हणाला धोनीला जाऊन सांग मी त्याच्यापेक्षा चांगला गोल्फर आहे.
षटक संपल्यावर तिवारीने ही गोष्ट धोनीला सांगितली. तिवारी म्हणाला, दादा, केविन पीटरसन म्हणतोय की तो तुमच्यापेक्षा उत्तम गोल्फर आहे. तेव्हा धोनी तिवारीच्या जवळ जाऊन त्याच्याकडील माईकद्वारे पीटरसनपर्यंत आवाज पोहोचेल अशा इराद्याने म्हणाला, तो (पीटरसन) आजही माझा पहला कसोटी बळी आहे. दरम्यान, केविन पीटरसनने मंगळवारी (१६ मे) ट्विटरवर पुरावा म्हणून एक व्हिडीओ शेअर केला आणि सांगितलं की, मी धोनीची पहिली टेस्ट विकेट नव्हतो.
केविन पीटरसनने शेअर केलेल्या व्हिडीओतून स्पष्ट होतंय की, धोनी पीटरसनला बाद केलं नव्हतं. भारत आणि इंग्लंडिवरुद्धच्या एका कसोटी सामन्यात धोनी गोलंदाजी करत होता. धोनीने फेकलेला एक चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून गेला आणि यष्टीरक्षण करणाऱ्या राहुल द्रविडच्या पंजात जाऊन विसावला. भारतीय खेळाडूंनी अपील केलं आणि पंच बिली बाऊडेन यांनी पीटरसनला बाद घोषित केलं. परंतु पीटरसनने यावर रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी पीटरसनला नाबाद घोषित केलं. या व्हिडीओतून स्पष्ट होतंय की, धोनीने पीटरसनला बाद केलं नव्हतं.
मुळात धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये एकही बळी घेतलेला नाही. ९० कसोटी सामन्यांपैकी ७ डावांमध्ये धोनीने गोलंदाजी केली आहे. संपूर्ण कारकीर्दीत धोनीने १६ षटकं गोलंदाजी केली आहे. परंतु तो कधीही विकेट काढू शकला नाही.