India vs South Africa 1st Test Match: सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मंगळवार २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाचे स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेत पोहोचले होते. २४ डिसेंबर रोजी भारतीय संघातील खेळाडूंनी जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी, भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर खेळाडूंनी गेंड्याबरोबर एक फोटो क्लिक केला होता. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली की, गेंड्याला शांत करण्यासाठी इजा झाली असावी. केविन पीटरसनने आता सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
केविन पीटरसन हा गेंड्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी एक एनजीओ चालवतो. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने भारतीय चाहत्यांनी पोस्ट केलेल्या या चित्रावर आपले मत व्यक्त केले आणि ट्वीटरवर लिहिले, “हा एका विश्वासू संवर्धन संस्थेद्वारे नैतिकतेने चालवल्या जाणार्या कार्यक्रमाचा भाग आहे. लोकांबरोबर फोटो काढण्यासाठी या प्राण्याला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही. हे असे सांगणे खरोखर दिशाभूल करणारे आहे आणि दक्षिण आफ्रिकेतील संरक्षण संस्थांना बदनाम करते, जे या प्रतिष्ठित प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लोक मुद्दामहून याला वेगळा रंग देत आहेत.”
सामन्यात आतापर्यंत काय झाले?
कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ ५९ षटके खेळता आली. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावात आठ विकेट्सवर २०८ धावांनी आघाडीवरुन पुढे खेळायला सुरुवात केली आणि त्यात ३७ धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव २४५ धावांवर संपला. चहापानाच्या वेळेपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २००/३ होती. डीन एल्गर शतक झळकावून क्रीजवर आहे. दुसऱ्या बाजूला बेडिंगहॅम त्याला साथ देत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांना ही भागीदारी लवकरच तोडावी लागणार आहे. तसे न झाल्यास आफ्रिकन संघ महत्त्वपूर्ण आघाडी घेऊ शकतो.
तत्पूर्वी, सेंच्युरियनमध्ये दुसऱ्यांदा शतक झळकावत लोकेश राहुलने एक नवा इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मधल्या फळीत फलंदाजी करत एक विकेटकीपर म्हणून शतक झळकावणारा ऋषभ पंतनंतरचा दूसरा खेळाडू बनला आहे. २०१४, २०१८-१९ आणि आता २०२३-२४ बॉक्सिंग डे कसोटीत शतक कारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. के.एल. राहुलने १३३ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि चार षटकार मारले आहेत. राहुलने जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले.
हेही वाचा: Smruti Mandhana: स्मृती मानधनाला जोडीदार म्हणून कसा पती हवा आहे? केबीसी मधील Video व्हायरल
भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची प्लेइंग –११
भारत– रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका– डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डीजॉर्ज, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हर्नी, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्जर.