नवी दिल्ली : पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल केले गेले असले, तरी रवींद्र जडेजा आणि के.एल. राहुल यांच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडीची डोकेदुखी वाढली आहे.
हैदराबाद कसोटी सामन्यात पहिल्या डावात राहुल आणि जडेजाचे योगदान महत्त्वाचे होते. पण, दुसऱ्या डावात भारताची सगळीच गणिते चुकली. प्रमुख अस्त्र असलेली फिरकी गोलंदाजी चालली नाही आणि आघाडीच्या फलंदाजांनीही आपल्या गुणवत्तेला न्याय दिला नाही. अशातच एकेरी धाव पळताना जडेजाचे स्नायू दुखावले, तर राहुलची मांडी दुखावल्यामळे दोघेही दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले.
इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ नियोजनासमोर आधीच गडबडून गेलेल्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर या दोघांच्या अनुपलब्धतेमुळे चिंतेची भर पडली आहे. जडेजाची अष्टपैलू उपयुक्तता आणि राहुलची भरवशाची फलंदाजी अशा दोन्ही आघाडयांवर भारताला आता नवा शोध घ्यावा लागणार आहे. विराट कोहलीने यापूर्वीच दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. या सगळया रिकाम्या जागा भरण्यासाठी निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समोर सर्फराज खान, सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सर्फराजचा भारतीय संघात शिरकाव झाला असला, तरी सध्याच्या स्थितीत राहुलची जागा घेण्यासाठी रजत पाटीदारचे पारडे जड आहे. पाटीदारला विराटच्या माघारीनंतर पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानच संघात स्थान देण्यात आले होते. त्याचवेळी फिरकीसाठी जडेजाची जागा कुलदीप घेऊ शकतो. त्यामुळे अश्विन, अक्षर पटेलबरोबर तिसऱ्या फिरकी गोलंदाजीचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. एकूणच नव्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी अंतिम अकरामध्ये यापूर्वी संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंना प्राधान्य मिळू शकते.
हेही वाचा >>> IND vs ENG Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाला दिला इशारा; म्हणाला, “स्वत:च्याच जाळ्यात…”
अंतिम अकरा खेळाडूंमध्ये बदल करायचा झालाच तर, संघ व्यवस्थापन चार फिरकी गोलंदाजांसह खेळू शकते. यासाठी मोहम्मद सिराजला वगळून कुलदीपला संधी दिली जाऊ शकते. त्याचवेळी सर्फराज खान किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाचा विचार करू शकते. जडेजाप्रमाणे डावखुरा फिरकी गोलंदाज असणारा सौरभ कुमार फलंदाजीही चांगली करू शकत असल्यामुळे त्याचाही विचार केला जाऊ शकतो. एकूणच संघ व्यवस्थापनाची स्थिती आता तरी गोंधळलेली दिसत आहे.
दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे होणार असून, येथील खेळपट्टी किमान पहिल्या डावात तरी फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. आतापर्यंत येथे दोन कसोटी सामने झाले असून २०१९ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात ५०२ धावांचा डोंगर उभा केला होता. मयांक अगरवालने दुहेरी शतक, तर रोहितने १७६ धावांची खेळी केली होती. त्यामुळे जडेजाच्या जागी संघ व्यवस्थापन निश्चितपणे अष्टपैलू किंवा निव्वळ फलंदाजाचा विचार करू शकेल.
गोंधळलेल्या अवस्थेत संघ व्यवस्थापन इंग्लंडचे फलंदाज ज्या पद्धतीने पहिल्या कसोटीत खेळले ते बघता भारतात येताना ते ठोस अशा योजना घेऊन आले आहेत. यात त्यांनी पहिल्या कसोटीत तरी काही बदल केले नाहीत. ‘स्वीप’ फटक्याचा मुक्त वापर करून त्यांनी भारतीय फिरकी गोलंदाजीवर दडपण आणले. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण करून फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज असल्याचाच धडा पहिल्या कसोटी सामन्याच्या निकालाने दिला आहे.