सलामीवीर हर्षद खडीवाले याने केलेल्या शानदार द्विशतकामुळेच महाराष्ट्रास रणजी क्रिकेट सामन्यात गोव्याविरुद्ध पहिल्या डावात ६३५ धावांचा डोंगर रचता आला. दिवसअखेर गोवा संघाने पहिल्या डावात १ बाद ७१ अशी सावध सुरुवात केली.
गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने ३ बाद ३६३ धावांवर पहिला डाव शुक्रवारी पुढे सुरू केला. खडीवाले व अंकित बावणे यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत चौथ्या विकेटसाठी १३८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बावणे याने सात चौकार व एक षटकारासह ७१ धावा केल्या. बावणे याच्या पाठोपाठ महाराष्ट्राने कर्णधार रोहित मोटवानी (६) याची विकेट लगेचच गमावली, मात्र त्याच्या जागी आलेल्या श्रीकांत मुंढे याने खडीवाले याला चांगली साथ दिली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी १०५ धावांची भर घातली. जवळ जवळ चारशे चेंडू खेळणाऱ्या खडीवाले याने २६२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ३२ चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. खडीवाले बाद झाल्यानंतर मुंढे याने खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत आकर्षक फटकेबाजी केली. त्याने केलेल्या ७५ धावांमध्ये सात चौकार व एका षटकाराचा समावेश होता. अक्षय दरेकर याने शेवटच्या फळीत दमदार २८ धावा केल्या. महाराष्ट्राने १५३.४ षटकांत ६३५ धावा केल्या. गोव्याकडून ऑफस्पीनर अमित यादव याने प्रभावी गोलंदाजी करीत १५५ धावांमध्ये सात बळी घेतले.
उर्वरित खेळात गोव्याने २६ षटकांत १ बाद ७३ धावा केल्या. त्यामध्ये मुंढे याने त्यांचा सलामीचा फलंदाज अमोघ देसाई (२८) याला तंबूत धाडले. मात्र अपेक्षेइतका लाभ महाराष्ट्राच्या गोलंदाजांना घेता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद ६३५ (हर्षद खडीवाले २६२, केदार जाधव १०६, अंकित बावणे ७१, श्रीकांत मुंढे ७५, अक्षय दरेकर २८, अमित यादव ७/१५५)
गोवा पहिला डाव : १ बाद ७३ (अमोघ देसाई २८, स्वप्नील अस्नोडकर खेळत आहे २५, हर्षद गाडेकर खेळत आहे ११)

Story img Loader