Khalistani In Boxing Day Test : भारतीय क्रिकेट संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला (बॉक्सिंग डे कसोटी) आजपासून मेलबर्नच्या, मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली आहे. अशात या सामन्याच्या दरम्यान काही खलिस्तान समर्थक तिकिटाविना मैदानात घुसले आणि भारत विरोधी घोषणा देत झेंडे फडकवू लागले. यानंतर व्हिक्टोरिया पोलिसांनी त्यांना हटवले. यावेळी भारतीय चाहत्यांनी तिरंगा उंचावत भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मेलबर्न क्रिकेट मैदानावर खलिस्तान समर्थक आणि भारतीय चाहत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादावर एएनआयशी बोलताना एक चाहता म्हणाला, “मला त्यांना कोणतीही प्रसिद्धी देण्याची गरज वाटत नाही. ते काहीही करतात. ते कधीही पंजाबला आलेले नाहीत आणि हा मूर्खपणाचा अजेंडा राबवत आहेत.”
याबाबत बोलताना आणखी एक प्रेक्षक म्हणाला की, “याला आमचे समर्थन नाही. आमचा एक मित्र आहे, जो पंजाबचा आहे, तोही त्याचे समर्थन करत नाही. तुम्हाला असे काही करायचे असेल तर भारतात जाऊन करा.”
‘एमसीजी’वर नेमकं काय घडलं?
एएनआय या वृत्तसंस्थने दिलेल्या माहितीनुसार, मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू असताना, खलिस्तान समर्थक खलिस्तानचा झेंडा घेऊन एमसीजीमध्ये घुसले. त्यानंतर या खलिस्तान समर्थकांना भारतीय चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
यावेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या खलिस्तान समर्थकांना भारताचा तिरंगा झेंडा फडकावत आणि घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळताच मेलबर्न पोलिसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला आज सुरुवात झाली आहे. यामध्ये शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पहिल्या दिवसाचा ८३ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून, यामध्ये ऑस्ट्रेनियाने ६ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आहेत.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. त्यानंतर तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. सध्या ही मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.