कॉफी विथ करणमध्ये महिलांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. चौकशी होईपर्यंत भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आता मुंबईतील खार जिमखान्याने हार्दिक पंड्याचं मानद सदस्यत्व रद्द केलं आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये जिमखान्याने हार्दिक पंड्याला तीन वर्षांसाठी मानद सदस्यत्व दिलं होतं.
‘सोशल मीडियावर आमचे चार हजार सदस्य असून हार्दिक पंड्या आणि त्याने केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. सदस्यांना आणि त्यात खासकरुन महिलांनी हार्दिक पंड्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आमच्या व्यवस्थापकीय समितीने ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेलं तीन महिन्यांचं मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला’, अशी माहिती खार जिमखान्याचे सहसचिव गौरव कपाडिया यांनी दिली आहे.
खार जिमखान्याने याआधी सचिन तेंडुलकर, लिअँडर पेस, महेश भुपती, सानिया मिर्झा, सायना नेहवाल यासारख्या खेळाडूंना खार जिमखान्याचं मानद सदस्यत्व बहाल केलं आहे.
याआधी हार्दिक पंड्याने जिलेट कंपनीसोबतचा करार गमावला आहे. हार्दिक पंड्याकडे एकूण सात स्पॉन्सरशिप करार असून हा वाद होण्याआधी त्याच्याकडे भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात होतं. बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर हार्दिक पंड्या आणि के एल राहुलने बिनशर्त माफी मागितली आहे.
वादानंतर हार्दिक पंड्या आणि के एल राहुलला बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावलं. महत्त्वाचं म्हणजे 2019 वर्ल्ड कपसाठी फक्त पाच महिने शिल्लक असून त्याच्या भविष्यावर टांगती तलवार आहे.