पंचकुला : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करताना एकूण नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राला योगासनांत पाच, वेटलिफ्टिंगमध्ये तीन, सायकिलगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले.
ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये रविवारी महाराष्ट्राने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लयलूट केली. पारंपरिक योगा प्रकारात सुमित भंडारे (सुवर्ण), आर्टिस्टिक दुहेरीत वैदेही मयेकर आणि युगांका राजम (सुवर्ण), मुलांच्या आर्टिस्टिक दुहेरीत आर्यन खरात आणि निबोध पाटील (सुवर्ण), मुलांच्या रिदमिक योगामध्ये नानक अभंग आणि अंश मयेकर (सुवर्ण), मुलींमध्ये स्वरा गुजर आणि गीता शिंदे (सुवर्ण), पारंपरिक योगा प्रकारात तन्वी रेडीज (रौप्य) यांनी चमक दाखवली.
वेटलिफ्टिंगमध्ये काजल सलगर (४० किलो), तसेच मुकुंद आहेर (५५ किलो) आणि हर्षदा गरूड (४५ किलो) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. सायकिलगमध्ये टाईम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटे (सुवर्ण), स्क्रॅच शर्यतीत पूजा दानोळेने (रौप्य), सांघिक स्प्रिंटमध्ये आदिती डोंगरे, पूजा दानोळे व संज्ञा कोकाटे (रौप्य) यांनीही पदके पटकावली. कुस्तीमध्ये प्रगती गायकवाडने (५७ किलो) रौप्यपदक आपल्या नावे केले. तसेच गौरी पाटील (४६ किलो) आणि धनश्री फंड (५७ किलो) यांनी कांस्यपदके पटकावली.