राज्य शासनाने आयोजित केलेली भाई नेरूरकर स्मृतिचषक खो-खो स्पर्धा व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली पुणे महापौर चषक खो-खो स्पर्धा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेण्याच्या प्रयत्नात अव्वल खेळाडूंना मात्र चांगलाच फटका बसला आहे.
नेरूरकर स्मृतिचषक स्पर्धा रत्नागिरी येथे २७ फेब्रुवारी ते २ मार्च अशी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र पुण्यातील महापौर चषक स्पर्धा त्याच काळात घेतली जाणार होती. राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्पर्धेसाठी नेरूरकर चषक स्पर्धा २७ फेब्रुवारीऐवजी २ मार्च रोजी सुरू करण्यास सांगितले. खो-खोपटूंना दोन्ही स्पर्धामध्ये
भाग घेण्याचा मार्ग मोकळा
 झाला.
रत्नागिरी येथे रविवारी नेरूरकर स्पर्धेला रविवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत जिल्ह्य़ांचे संघ सहभागी झाले आहेत. ठाणे, मुंबई व पुणे यांचे संघही तेथे सहभागी झाले आहेत. पुण्यातील महापौर स्पर्धेत सहभागी झालेल्या या तीन संघांमधील खेळाडूंना रत्नागिरी येथील स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी या संघांचे रविवारऐवजी सोमवारी पहिले साखळी सामने ठेवण्यात आले. मात्र या खेळाडूंची सोमवारी सकाळच्या सत्रात खेळताना दमछाक होईल, याचा फारसा विचार करण्यात आला नसावा. कारण पुण्याहून रत्नागिरी येथे पोहोचण्यासाठी किमान दहा तासांचा बसप्रवास करावा लागतो.
नेरूरकर चषक स्पर्धेसाठी शासकीय ठराव होण्यास विलंब झाल्यामुळेच स्पर्धेसही विलंब झाला. अन्यथा खेळाडूंची दमछाक झाली नसती. याचप्रमाणे ऐन परीक्षेच्या वेळीही खेळाडूंना स्पर्धेत खेळायचे की परीक्षा द्यायची या पेचप्रसंगास सामोरे जावे लागले नसते, असे महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.