क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि पुणे व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे संघांनी विजयी आगेकूच केली. किशोर गटात पुण्याने सोलापूर संघावर १०-९ असा निसटता विजय मिळवला. पुण्याकडून वृषभ वाघने ३ आणि २ मिनिटे संरक्षण केले. किशोरी गटात अहमदनगरने पुण्यावर १०-८ असा १.३० मिनिटे राखून मात केली. मयुरी मुत्यालने २.५० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. प्रगती कंठाळेने २.५० मिनिटे संरक्षण केले. महिलांमध्ये मुंबई संघाने जळगाव संघाला १२-८ असे एक डाव आणि ४ गुणांनी नमवले. शुभांगी जाधवने ३.४० मिनिटे संरक्षण केले. दर्शना सकपाळने २.४० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. ठाणे संघाने पुजा आणि प्रियांका भोपे भगिनींच्या शानदार खेळाच्या जोरावर जळगाव संघाचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुणांनी पराभव केला. पुरुष गटात उपनगरने अमरावती संघावर १५-८ असा एक डाव आणि ७ गुणांनी विजय मिळवला. किरण कांबळेने ६ गडी बाद केले. अनिकेत पोटेने १.३० आणि ४.१० मिनिटे संरक्षण करताना ३ गडीही बाद केले. यजमान नाशिक संघाने नागपूरवर एक डाव आणि ४ गुणांनी मात केली.
सांगलीने सोलापूर संघावर १५-१२ असा एक डाव आणि ३ गुणांनी विजय मिळवला. नरेश सावंत आणि तानाजी सावंत यांनी प्रत्येकी २.१० मिनिटे संरक्षण केले. रमेश सावंतने ४ गडी बाद केले. कोल्हापूरने नागपूरचा १६-९ असा एक डाव आणि ७ गुणांनी धुव्वा उडवला. उमेश सातपुतेने ४.४० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले. प्रशांत शेळकेने ५ गडी बाद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho competition