कोकणात प्रथमच झालेल्या भाई नेरुरकर स्मृतिचषक खो-खो स्पध्रेतील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात सांगलीच्या संघाने कोल्हापूरवर ६ गुणांनी मात करत विजेतेपद पटकावले. महिला गटात हा मान ठाण्याच्या संघाने पुण्याचा केवळ १ गुणाने पराभव करत प्राप्त केला.
प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झालेल्या पुरुषांच्या अंतिम फेरीत सांगलीने १९-१३च्या फरकाने जेतेपदावर नाव कोरले. सांगलीच्या संघाकडून सुरेश, नरेश आणि रमेश सावंत हे तीन सख्खे भाऊ अंतिम सामन्यात खेळले.
या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना अलाहिदा डावापर्यंत रंगला. त्यामध्ये मुंबईने उपनगर संघाचा पराभव केला. मुंबईतर्फे रूपेश खेतले, आदेश पाडावे, तेजस शिरसकर यांनी, तर उपनगराकडून अनिकेत पोटे, नचिकेत जाधव व अक्षय भांगरेने उत्कृष्ट खेळ केला.
महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने केवळ एका गुणाने (९-८) पुण्यावर बाजी मारली. पुण्याकडून (२.३० मिनिटे), प्रणाली बेनके (२.२० मिनिटे) व काजल भोर (२.१० मिनिटे) यांनी चांगले संरक्षण केले, तर ठाण्याकडून पौर्णिमा सकपाळने ३.१० मिनिटांचा खेळ करत १ गडी बाद केला. तिला प्रियंका भोपी (३ व १.५० मिनिटे), पूजा भोपी (२.१० मिनिटे) आणि शीतल भोर (नाबाद २.२० मिनिटे) यांनी चांगली साथ देत अखेर संघाचा विजय साकार केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात उस्मानाबादने मुंबईचा पराभव केला. यजमान रत्नागिरीने बलाढय़ कोल्हापूर आणि मुंबई उपनगर संघाचा साखळी सामन्यामध्ये पराभव करत पाचवे स्थान मिळवले.
स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू
पुरुष गट – आक्रमण : कुशल शिंदे (सांगली), अष्टपैलू : मिलिंद चावरेकर (सांगली), संरक्षण : बाळासाहेब पोकार्डे (कोल्हापूर)
महिला गट – आक्रमण : करिष्मा बने (पुणे), अष्टपैलू : सुप्रिया गाढवे (उस्मानाबाद), संरक्षण : प्रियंका भोपी (ठाणे).