दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेपाठोपाठ झालेल्या आशियाई खो-खो अजिंक्यपद स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. अनेक परदेशी लोकांनीही त्याचा आस्वाद घेतला असून या खेळास आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भवितव्य आहे, असे भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षक नरहर कुंदर यांनी सांगितले.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच खो-खो खेळाचा स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच इंदूर येथे आशियाई वरिष्ठ खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धाचे वेळी सहभागी परदेशी संघांबरोबरच अन्य काही देशांचेही क्रीडा संघटक खो-खो सामने पाहण्यासाठी आले होते.
कुंदर यांनी सांगितले की, ‘गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अन्य आशियाई संघांच्या कौशल्यात खूप प्रगती झाली आहे. बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, नेपाळ आदी देशांमधील खेळाडूंमध्ये खूपच उत्साह दिसून आला. खुंटावर गडी टिपणे, चौघात खेळणे, हुलकावणी देणे, मध्यभागी गडी बाद करणे आदी विविध तंत्रे त्यांनी आत्मसात केली आहेत. या खेळासाठी आवश्यक असणारी शरीरयष्टी त्यांच्याकडे आहे. वेगवान खेळ करण्याबाबतही ते कमी नाहीत. फक्त भारतीय खेळाडूंसारखे कौशल्य त्यांच्याकडे नाही. या संघांमधील खेळाडूंना भारतीय खेळाडूंबरोबर अधिकाधिक सामने खेळण्याची संधी मिळाली तर त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल. त्यांच्या संघांकडे अव्वल दर्जाचे मार्गदर्शक नाहीत. या देशांमध्ये खो-खो खेळाच्या प्रसारासाठी व तेथील खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी आपण प्रशिक्षक नियुक्त केले पाहिजेत. त्यांच्याबरोबर प्रदर्शनीय सामने आयोजित केले पाहिजेत. सूर मारण्याच्या तंत्रात कोरियन खेळाडू वाकबगार आहेत. मात्र अचूकतेमध्ये ते कमी पडतात.’
प्रो कबड्डीद्वारे कबड्डीला वलय प्राप्त झाले आहे, तसे वलय खो-खो खेळास मिळेल काय, असे विचारले असता कुंदर म्हणाले, ‘खो-खो खेळाची गुणात्मक प्रगती होण्याची आवश्यकता आहे. प्रो लीगसारख्या स्पर्धा आयोजित केल्या, तर निश्चितपणे खो-खोची झपाटय़ाने प्रगती होईल. प्रो कबड्डी लीगद्वारे खेळाडूंना भरपूर आर्थिक फायदा झाला आहे. दुर्दैवाने खो-खो खेळामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक हमी मिळत नाही. शासकीय नोक ऱ्यांमध्ये फारशी संधी मिळत नाही. खेळाडूंना अर्थार्जनाची खात्री मिळाली तर ते निश्चितपणे या खेळात टिकून राहतील.’
‘आमच्या खेळाची चांगल्या रीतीने प्रगती करायची असेल, तर २०२० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून समावेश करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटकांनी सतत पाठपुरावा केला पाहिजे,’ असेही कुंदर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा