‘‘माझ्या क्रिकेट खेळामधील यशात खो-खोचा वाटा मोलाचा आहे. खेळातली चपळता आणि तंदुरुस्तीचा मंत्र खो-खोनेच मला दिला. मी राष्ट्रीयस्तरापर्यंत खो-खो खेळलो. त्या अनुभवाचा मला खुप फायदा झाला,’’ असे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी सांगितले.
यूआरएल फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रीडा गौरव पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने मोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘क्रिकेटपटूंमध्ये चपळता यावी, यासाठी खो-खो खेळण्याचा सल्ला मी युवा खेळाडूंना देत असतो. या खेळांमध्ये कारकीर्द घडवता येते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या खेळांचा प्रसार करायचा असेल तर सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायला हवे.’’ या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी सांगितले की, ‘‘खेळ कोणताही असो, मुलांनी मैदानाकडे वळले पाहिजे.’’ मल्लखांब संघटक मीनल जोशी-राईलकर, कॅरम संघटक रवींद्र मोडक, कबड्डी संघटक सदानंद भोसले आणि खो-खो संघटक रमाकांत शिंदे यांना या समारंभात गौरवण्यात आले.