कबड्डीसारख्या मातीतल्या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेत त्यामध्ये सातत्यही राखले, पण खो-खोसारख्या कौशल्यपूर्ण आणि चपळ खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तग धरण्यात मात्र अपयश येत होते. १९९६ साली आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा खेळवण्यात आली होती, त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी खो-खो आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये गुवाहाटी, शिलाँग येथे १० ते २० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये (सॅफ) खो-खो या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत आठ देशांनी खो-खो खेळण्यासाठी प्रवेश नोंदवला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याचे स्वप्न येत्या काही दिवसांमध्ये सत्यात उतरणार आहे.
१९९६ साली आशियाई खो-खो स्पर्धा भरवण्यात आली होती, पण त्यानंतर गेल्या १९ वर्षांमध्ये या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाय रोवण्यात अपयश येत होते. शरद पवार कबड्डी आणि खो-खो या दोन्ही मातीतील खेळांच्या संघटनेवर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, पण कबड्डीच्या संघटकांना ज्या पद्धतीने खेळाचा विकास, प्रचार करता आला तसे खो-खोमधील संघटकांना जमत नव्हते. पण उशिरा का होईना, पण खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
याबाबत भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव सुरेश शर्मा म्हणाले की, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला स्थान मिळवून देणे हे आमचे स्वप्न होते आणि ते आता सत्यात उतरत असल्यामुळे नक्कीच आनंद होत आहे. सॅफ खेळांनंतर आशियाई क्रीडा स्पध्रेमध्येही खो-खोचा समावेश करावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि येत्या काळात आम्हाला त्यामध्येही यश मिळेल. गेली बरीच वर्षे खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, त्यामध्ये बराच कालावधी लागला असला तरी खेळ आणि खेळाडूंचा आता होणारा फायदा आपण बघायला हवा.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* खो-खोसारखा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणार असल्याची बातमी ऐकून आनंद झाला. महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ही जास्त आनंदाची गोष्ट आहे, कारण राष्ट्रीय संघामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक खेळाडू खेळत असतात, त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाय रोवण्यासाठी जास्त वेळ लागला हे मान्य आहे. पण मला वैयक्तिकपणे असे वाटते की, यामध्ये कुठे तरी संघटक कमी पडले असावेत,
पण आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला भरारी
कशी घेता येईल, याचा विचार करायला हवा.
चंद्रजीत जाधव (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho launch in saf e