२६व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) सब – ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.
किशोरी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राने कोल्हापूर संघावर २१-११ असा विजय मिळवला. वृषभ वाघाने २.५० मिनिटांचा नाबाद खेळ आणि ५ खेळाडू बाद केले. कर्णधार काशिलिंग हिरेकुर्बने (२.१० मि., १.३० मि. व ३ खेळाडू) उल्लेखनीय खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तेलंगणने पश्चिम बंगालवर १८-१३ असा विजय साजरा केला.
किशोरी गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा १२-९ असा एक डाव व ३ गुणांनी धुव्वा उडविला. महाराष्ट्राच्या साक्षी वाघ (२ मि.), मयूरी मुत्याल (१.४० मि. व ३ खेळाडू), प्राजक्ता पवार (१.५० मि. व २ खेळाडू) व ज्ञानेश्वरी गाढे (२ मि. व २ खेळाडू) या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकने गुजरातचा ७-६ असा केवळ एका गुणाने निसटता पराभव केला.
दुहेरी जेतेपदाची संधी
कुपवाडा : वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक स्पध्रेत महाराष्ट्राला दुहेरी जेतेपदाची संधी आहे. महाराष्ट्राने पुरुष व महिला गटाच्या अंतिम फेरीत सहज प्रवेश केला आहे. पुरुष संघाने आंध्र प्रदेशचा १७-४ असा १ डाव व १३ गुणांनी पराभव केला. रमेश सावंत (३.३० मि.), रंजन शेट्टी (५ खेळाडू) व मिलिंद चावरेकरने (४ खेळाडू) यांनी चमकदार खेळ केला. महिलांनी पश्चिम बंगालवर २२-१० असा १ डाव व १२ गुणांनी विजय मिळवला. सुप्रिया गाढवे, श्वेता गवळी , शीतल भोर यांनी दमदार खेळ केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा