स्पर्धात्मक युगात कोणत्याही खेळाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी त्याला ‘ग्लॅमर’ देण्याची आवश्यकता आहे. कबड्डी या मराठी मातीमधील खेळाला जागतिक स्तरावर ‘ग्लॅमर’ मिळाल्यामुळेच हा खेळ घराघरांत पोहोचला आहे. खो-खो खेळालाही अशी संजीवनी मिळाली, तर पुन्हा या खेळाची भरभराट होईल, असे रेल्वेचा खो-खोपटू विलास कारंडेने सांगितले.
बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रेल्वे संघाने अजिंक्यपद मिळविले. या विजेतेपदामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या विलास याला ‘एकलव्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तो रेल्वेकडून खेळत असला, तरी एरवी मुंबईतील ओम समर्थ व्यायाम मंदिर संघाकडून विविध स्पर्धामध्ये भाग घेतो. आपल्या कारकीर्दीविषयी व खेळाच्या भवितव्याबाबत त्याने आपली मते व्यक्त केली.

*एकलव्य पुरस्कार मिळविण्याबाबत आत्मविश्वास होता का?
हो, गेली चार वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या रेल्वे संघाकडून माझा खेळ चांगला झाला होता. त्यामुळे यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करीत हा किताब मिळविण्याची मला खात्री होती. यंदाच्या स्पर्धेत अपेक्षेनुसार माझा खेळ समाधानकारक झाला व या किताबावर मी मोहोर नोंदविली.

*या पुरस्काराचे श्रेय तू कोणास देशील?
या पुरस्कारामध्ये माझे आईवडील तसेच माझे प्रशिक्षक केदार सुर्वे यांचा मोठा वाटा आहे. प्रकाश रहाटे यांनाही मी आदर्श मानतो. त्यांच्याप्रमाणेच आपण खो-खोमध्ये वाटचाल करीत राहावी असे मी महाविद्यालयीन जीवनापासून ठरविले होते. त्याप्रमाणे मी खो-खो खेळात वाटचाल केली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही याचे श्रेय देता येईल. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी या खेळात चांगली प्रगती करू शकलो आहे.

*शिवछत्रपती पुरस्कार मिळू शकत नाही याची खंत वाटते का?
कारकीर्दीत सुरुवातीला मी महाराष्ट्राकडून खेळलो, मात्र शेवटी अर्थार्जनही महत्त्वाचे आहे. मध्य रेल्वेत खेळाडू म्हणून नोकरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत मी त्यांच्याकडूनच खेळत आहे. त्यामुळे शिवछत्रपती पुरस्कार मिळणार नाही याची कल्पना मला होती. हे लक्षात घेऊनच ‘एकलव्य’ या तितक्याच प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे मेहनत करीत होतो.

*अन्य खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रीमियर लीग स्पर्धा होत आहेत. अशा स्पर्धा खो-खोमध्ये होण्याबाबत तुझे काय मत आहे?
खेळाचा प्रसार व प्रचार तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल, तर राष्ट्रीय स्तरावर लीग स्पर्धा घेण्याची गरज आहे. त्यामुळे खेळाडूंना चार पैसे मिळतील, पण त्याचबरोबर या खेळाची लोकप्रियताही वाढेल. अन्य खेळांमधील खेळाडूंना पेट्रोलियम, बहुराष्ट्रीय कंपन्या, सार्वजनिक बँकांमधून नोकरी मिळते. खो-खोपटूंना अगदी मोजक्याच ठिकाणी नोकरी मिळते. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी लीगची गरज आहे. या खेळातील चुका नेमक्या कशा होतात, हा खेळ कसा खेळला जातो याची सविस्तर माहिती सर्व प्रेक्षकांना मिळण्याची गरज आहे. त्याकरिता वाहिन्यांचे सहकार्य अनिवार्य आहे. तसेच अशा लीगद्वारे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळते. वेगवेगळ्या संघांमधील खेळाडूंमध्ये वैचारिक देवाणघेवाण होते. नवोदित खेळाडूंना अनुभवी खेळाडूंकडून भावी कारकीर्दीसाठी शिकवणीची शिदोरीही मिळते.

*मॅटवर खो-खो खेळला तर त्याचा खेळावर कसा परिणाम होईल?
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ अधिकाधिक देशांमध्ये पोहोचण्यासाठी मॅटवरील सामन्यांची गरज आहे. मॅटवरील सामन्यांमुळे खेळ गतिमान होईल व प्रेक्षकांनाही रंगतदार लढती पाहण्याचा आनंद घेता येईल.

*‘एकलव्य’ पुरस्कार मिळाला, आता पुढे काय?
मी जरी राष्ट्रीय स्तरावर खेळत असलो, तरी आमच्या क्लबमधील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करीत असतो. मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला नाही, मात्र माझ्या क्लबमधील युवा खेळाडूंना हा पुरस्कार मिळावा हे ध्येय साकारण्याचे माझे ध्येय आहे.

Story img Loader