खो-खो हा भारतीय मातीतला खेळ असला तरी बदलत्या काळाबरोबर खेळाच्या व्यापक प्रसारासाठीच आता मॅटचा पर्याय स्वीकारला जाऊ लागला आहे. कबड्डी, खो-खो हे मातीतले खेळ मॅटवर खेळले जाणार म्हटल्यावर टीका होणे साहजिक आहे, मात्र भविष्याचा विचार करता मॅट हाच पर्याय योग्य आहे. शालेय स्तरावर, इंग्रजी माध्यमांच्या तसेच कॉन्व्हेंट शाळांमध्ये मातीवर खेळल्या जाणाऱ्या खो-खो या खेळाकडे अनेक मुले पाठ फिरवतात, पण मॅटवर खो-खोचे सामने झाल्यास ही परिस्थिती बदलू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला नेण्यासाठी मॅटचाच पर्याय उपयुक्त आहे, असे मत महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव चंद्रजित जाधव यांनी सांगितले.
मॅटच्या बाबतीत दवाचा मुद्दा कळीचा ठरतो, याबाबत जाधव म्हणाले, ‘‘दव पडून खेळपट्टी निसरडी आणि धोकादायक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे. दवाचा परिणाम होणार नाही अशा स्वरूपाची मॅट खर्चीक असली तरी उपयोगात आणण्याचा आमचा विचार आहे. खेळाडूंची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा त्यांच्या दुखापतींचे प्रमाण वाढेल याची खबरदारी घेण्यात येईल. केवळ खो-खो साठीच्या मॅट बनवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी टायगर टर्फ, शिवनेरी तसेच पुण्याच्या सुमीत कंपनीशी बोलणी सुरू आहेत. प्रत्येक खेळाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. यामुळे खो-खो खेळाचे बारकावे लक्षात घेऊन त्यानुसार मॅट बनवले जाणार आहेत.’’
‘‘प्रत्येक जिल्ह्याला दोन मॅट मिळणार असून, मातीवर खेळवल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा घाईघाईने मॅटवर खेळविण्यात येणार नाहीत. टप्प्याटप्प्याने मातीवरील स्पर्धा मॅटवर घेण्यात येतील. स्पर्धा झाल्यानंतर खेळाडू, तांत्रिक समिती, पंच यांच्याशी सल्लामसलत करण्यात येईल. ही मंडळी ज्या सूचना, सुधारणा सुचवेल त्यावर विचार करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल,’’ असे जाधव यांनी सांगितले.
आयोजन शानदार मात्र प्रेक्षकांची वानवा!
महाराष्ट्र खो-खो संघटना आणि महाराष्ट्र शासन क्रीडा संचालनालय यांच्यातर्फे स्पर्धेचे नेटके आयोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवणारे ४० संघ हजर राहिल्याने संपूर्ण हजेरीचा विक्रमही झाला. मात्र ज्या प्रेक्षकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ते प्रेक्षकच अनुपस्थित असल्याचे प्रकर्षांने जाणवले. नंदुरबार जिल्हा हा आदिवासीबहुल भाग आहे. या परिसरातल्या आदिवासी मंडळींमध्ये काठिया होळी उत्सवाचे प्रस्थ मोठे असते. हा उत्सव ४-५ दिवस चालतो. या उत्सवासाठी बहुतांशी मंडळी, विद्यार्थी आपापल्या गावाकडे परतल्याने स्पर्धकांचा हुरूप वाढवणारा घटकच बाजूला राहिला. ५००० प्रेक्षकांना सामावून घेईल अशी व्यवस्था केली होती. मात्र प्रेक्षक नसल्याने आमचाही हिरमोड झाल्याचे नंदुरबार खो-खो जिल्हा संघटनेचे खजिनदार मनोज परदेशी यांनी सांगितले.