क्रिकेटमध्ये आयपीएलने क्लबआधारित स्पर्धेचा पाया घातला. ही संकल्पना हळूहळू अन्य खेळांमध्येही रुजली आणि आता तर मराठमोळ्या खो-खोतही प्रीमिअर लीगची (केकेपीएल)सुरुवात होत आहे. लालबागच्या गुंता ग्रुपने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ११ ते १४ एप्रिलदरम्यान शिवाजी पार्क मैदानावर हे सामने रंगणार आहेत.
आयपीएलप्रमाणेच या स्पर्धेतही फ्रँचाइज पद्धत अवलंबण्यात येणार असून, मुंबई रायडर्स, सांगली स्मॅशर्स, पुणे फायटर्स, सबर्बन योध्दाज, ठाणे थंडर्स आणि अहमदनगर हिरोज हे सहा संघ असणार आहेत. महाराष्ट्रातील अ-श्रेणी खो-खोपटूंमधून ७२ खेळाडूंची या संघांमध्ये विभागणी केली जाणार आहे. या संघांच्या मार्गदर्शनासाठी छत्रपती, एकलव्य, अभिमन्यू पुरस्कारप्राप्त खेळाडूंना सामील करुन घेण्यात येणार आहे.
राहुल तामगावे, दीपक माने, अमोल जाधव, नचिकेत जाधव, विकास शिरगावकर, मनीष बंडबे, सचिन पालकर, दाऊद शेख, दीपेश मोरे या अव्वल खो-खोपटूंचा खेळ पाहण्याची संधी खो-खो रसिकांना मिळणार आहे. पांडुरंग परब, नरेंद्र शाह, सुधाकर राऊळ, दीपक राणे, बिपीन पाटील आणि नितीन जाधव या मान्यवर प्रशिक्षकांच्या कामगिरीकडे खो-खोप्रेमींचे लक्ष आहे.

Story img Loader