पुण्याच्या पुरुष व महिला संघांनी २५ वर्षानंतर सोलापूरमधील वरिष्ठ गटाच्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील सर्वोत्कष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेली राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी प्रियांका इंगळे ठरली. पुरुष गटातील राजे संभाजी पुरस्काराचा मान प्रतीक वाईकर याने मिळविला. या स्पर्धेतील तृतीय स्थान महिला गटात उस्मानाबाद तर पुरुष गटात सांगलीने मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुण्यास ठाण्यावर १३-१२ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविताना विशेष कष्ट करावे लागले नाहीत. प्रियांका इंगळे (२.००,१.४० मिनिटे व ५ गुण), दीपाली राठोड (२.१०,१.०० मिनिटे २गुण) व श्वेता वाघ (१.५०, १.५०) यांच्या शानदार खेळीमुळे पुण्याने मध्यंतरास ९-५ अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या रेश्मा राठोड (१.५० मिनिटे ४ गुण), मृणाल कांबळे (४ गडी) व कविता घाणेकर (२.२० मिनिटे) यांची खेळी अपुरी पडली.

अंतिम सामन्याने डोळ्याचे पारणे फेडले, शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत

पुरुष गटात पुण्याने गतविजेत्या मुंबई उपनगरला १७-१६ असे एका गुणाने नमविले. डोळ्याचे पारणे फेडलेला हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक आक्रमणात मुंबई उपनगरचा गुण मिळविण्याचा तर पुणे संरक्षणात बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर शेवटच्या मिनिटात पुण्याने बचाव करीत बाजी मारली. पुण्याच्या मिलिंद करपे ( ५ गुण व १.०० मिनिटे), प्रतीक वाईकर (३ गुण व १.४०) व सागर लेंग्रे (१ गुण व १.४०) यांची अष्टपैलू खेळी संघाच्या विजयात महत्वपूर्ण ठरली.

मुंबई उपनगरच्या अक्षय भोंगरे ( ५ गुण व १.१०,१.०० मिनिटे), अनिकेत पोरे (२ गुण १.३०,१.००), ऋषिकेश मुरचावडे (१ गुण, १.३०,१.१०) याची अष्टपैलू लढत अपुरी पडली.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरसमध्ये स्पर्धेचे आयोजन

तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात लघुत्तम आक्रमणाच्या डावात महिला गटात उस्मानाबादने रत्नागिरीवर २३ सेकंदाने तर पुरुष गटात सांगलीने ठाणेवर ११ सेकंदाने मात केली. महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाचे प्रमुख उत्तम जानकर यांनी केले होते.

हेही वाचा : खो-खो अभ्यास दौऱ्यासाठी कोरियाचे पथक औरंगाबादेत

सर्वोत्कष्ट खेळाडू

पुरुष : अष्टपैलू आणि राजे संभाजी पुरस्कार: प्रतीक वाईकर (पुणे) संरक्षक: ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर)
आक्रमक: मिलींद कुरपे (पुणे)

महिला : अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्कार : प्रियांका इंगळे (पुणे), संरक्षक: श्वेता वाघ (पुणे), आक्रमक : रेश्मा राठोड (ठाणे).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho sport competition final round result know list of winner in malshiras solapur pbs