पाकिस्तानचा क्रिकेटपटू खुशदिल शहा आणि प्रेक्षकादरम्यान हाणामारी पाहायला मिळाली. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी सकाळी माऊंट मांघनाई इथे तिसरा वनडे सामना झाला. पाकिस्तानचा या लढतीत ४३ धावांनी पराभव झाला. ट्वेन्टी२० मालिकेपाठोपाठ वनडे मालिकेतही पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. मात्र सामन्यातल्या घडामोडींपेक्षा या घटनेचीच चर्चा जास्त रंगली.
बे ओव्हल इथे झालेल्या लढतीला काही अफगाणिस्तान प्रेक्षक उपस्थित होते. खुशदिल सीमारेषेनीजक क्षेत्ररक्षण करत होता. सामना संपल्यानंतर हे प्रेक्षक आणि खुशदिल यांच्यात बाचाबाची झाली. चाहत्यांच्या शेरेबाजीने भडकलेला खुशदिल त्या प्रेक्षकांच्या दिशेने धावून गेला. मैदानातील सुरक्षारक्षकांनी तसंच पाकिस्तानच्या खेळाडूंनी वेळीच मध्यस्थी करून खुशदिलला बाजूला केलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेसंदर्भात निवेदन जारी केलं आहे. सीमारेषेनजीक क्षेत्ररक्षण करणाऱ्या खुशदिलला उद्देशून आक्षेपार्ह भाषेत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला उद्देशून अशा भाषेचा प्रयोग करणं योग्य नाही. शनिवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान खुशदिलला आक्षेपार्ह शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्याने खुशदिलने त्यांना थांबण्याचं आवाहन केलं. मात्र अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी खुशदिलला उद्देशून आणखी आक्षेपार्ह शब्दात पश्तू भाषेत शेरेबाजी केली. पाकिस्तान संघाने यासंदर्भात तक्रार दाखल केली. स्टेडियमच्या सुरक्षायंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्या दोन प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढलं असं पीसीबीच्या निवेदनात म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत शेरेबाजीने व्यथित खुशदिल त्या चाहत्यांच्या दिशेने चालून जाताना दिसत आहे. पाकिस्तानसाठी हा दौरा निराशाजनक ठरला. न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने नव्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ जाहीर करण्यात आला. मात्र या संघानेही पाकिस्तानला टी२० तसंच वनडे प्रकारात नमवलं.
शनिवारी झालेल्या डेड रबर लढतीत न्यूझीलंडने २६४ धावांची मजल मारली. कर्णधार मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. रायस म्हिरूने ५८ धावा केल्या. डॅरेन मिचेलने ४३ धावा करत ब्रेसवेलला चांगली साथ दिली. पाकिस्तानतर्फे अकिफ जावेदने ४ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव ४० षटकात २२१ धावांतच आटोपला. बाबर आझमने ५० तर मोहम्मद रिझवानने ३७ धावा केल्या. बेन सीअर्सने ५ विकेट्स पटकावल्या. सलग दुसऱ्या लढतीत बेनने ५ विकेट्स पटकावण्याची किमया केली. ब्रेसवेलला सामनावीर तर बेनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याने ३ सामन्यात १० विकेट्स पटकावल्या.