IPL स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक ‘गूड न्यूज’ मिळाली आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आणि धोकादायक फलंदाज कायरन पोलार्ड याला सूर गवसला असून पोलार्ड एक धमाकेदार विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तानात होणाऱ्या PSL स्पर्धेत पोलार्ड पेशावर झल्मी या संघाकडून खेळात आहे. या संघाकडून खेळताना पोलार्डने झंझावाती खेळी करत टी २० किर्केटमधील ९ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. या बरोबरच हा टप्पा गाठणारा पोलार्ड केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.
पोलार्डने PSL मध्ये खेळताना शनिवारी २१ चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १ चौकार आणि तब्बल ४ षटकार खेचत ९ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याच्या या खेळीच्या जोरावर पेशावर संघाने २० षटकांत २१४ धावांचा पल्ला गाठला. ९ हजार धावांचा टप्पा गाठल्यामुळे त्याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम आणि विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
पोलार्डने आतापर्यंत टी २० स्पर्धांमध्ये मुंबई इंडियन्स, अडलेड स्ट्रायकर्स, बार्बाडोस ट्रायडेंट्स, केप कोब्रास, कराची किंग्स, ढाका ग्लॅडिएटर, मेलबर्न रेनेगेड्स, मुलतान सुलतान, पेशावर झल्मी, दक्षिण ऑस्ट्रेलिया, एसटी लुसिया स्टार, त्रिनिदाद – तोबॅगो आणि सोमरसेट या क्लब / फ्रॅन्चायजीकडून खेळला आहे. या फॉरमॅटमध्ये टी २० प्रकारातील धोकादायक फलंदाज म्हणून ओळख निर्माण केलेल्या पोलार्डने २००६ मध्ये पदार्पण केले. त्यांनतर आतापर्यंत पोलार्डने ४५८ सामन्यांत ९ हजार ३० धावा केल्या आहेत. त्याने १५०.४७ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. या खेळीत ५८५ षटकार व ५८५ चौकारांचा समावेश आहे. यातील आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांत पोलार्डने ५९ सामन्यांत ७८८ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार मॅकलमने ३७० टी २० सामन्यांत ७ शतके व ५५ अर्धशतकांसह ९ हजार ९२२ धावा केल्या आहेत. तर गेलच्या नावावर १२ हजार ३१८ धावा आहेत. त्याने २१ शतके आणि ७६ अर्धशतके झळकावली आहेत. पोलार्डच्या नावावर मात्र केवळ १ शतक आहे आणि 45 अर्धशतके आहेत.