Kieron Pollard hit 5 consecutive sixes against Rashid Khan Video viral : सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट लीग खेळवली जात आहे. या लीगचा २४ वा सामना साउथॅम्प्टनमधील द रोज बॉल क्रिकेट मैदानावर सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सदर्न ब्रेव्ह संघाने २ गडी राखून विजय मिळवला. ट्रेंट रॉकेट्सचा स्टार गोलंदाज राशिद खानसाठी हा सामना खूपच वाईट होता. या सामन्यादरम्यान, वेस्ट इंडिजच्या निवृत्त फलंदाजाने असा कहर केला, जो राशिद आता कधीच विसरु शकणार नाही. या खेळाडूचे नाव आहे किरॉन पोलार्ड, ज्याने राशिदच्या एक षटकात सलग पाच षटकार मारले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
किरॉन पोलार्डने राशिद खानची केली धुलाई –
द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये १००-१०० चेंडूंचे सामने होतात आणि एका षटकात ५ चेंडू असतात. या सामन्यात किरॉन पोलार्डने राशिद खानच्या एका षटकात ५ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. म्हणजे किरॉन पोलार्डने रशिदच्या षटकातील प्रत्येक चेंडू सीमापार पाठवले. द हंड्रेड क्रिकेट लीगच्या इतिहासात एका षटकात फलंदाजाने ५ षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. किरॉन पोलार्डने सदर्न ब्रेव्हच्या डावाच्या १७व्या षटकात ही कामगिरी केली.
किरॉन पोलार्ड ठरला विजयाचा शिल्पकार –
या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने १०० चेंडूत ८ गडी गमावून १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात सदर्न ब्रेव्ह संघाने हे लक्ष्य ९९ चेंडूत ८ गडी गमावून पूर्ण केले. यादरम्यान किरॉन पोलार्डने सदर्न ब्रेव्हसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने २३ चेंडूत १९५.६५ च्या स्ट्राईक रेटने ४५ धावा केल्या. किरॉन पोलार्डच्या या खेळीत २ चौकार आणि ५ षटकार पाहायला मिळाले. या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्ये ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारलेत –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारणारा किरॉन पोलार्ड हा देखील एक फलंदाज आहे. २०२१ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अकिला धनंजयाविरुद्ध एकाच षटकात ६ षटकार मारले होते. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो युवराज सिंगनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला. किरॉन पोलार्ड जरी निवृत्त झाला असला तरी टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटची धार अजून कमी झालेली नाही.