भारताविरूद्ध एकदिवसीय आणि टी २० मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघाला ‘व्हाईटवॉश’ मिळाला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघात मोठा बदल करण्यात आला असून मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. टी २० आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. ‘त्रिनिदाद आणि टोबॅगो गार्डियन’च्या वृत्तानुसार विंडिज क्रिकेट मंडळाच्या संचालकांनी शनिवारी हा निर्णय घेतला.
भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना सुरूवातीला टी २० मालिकेत ३-० असे यश मिळवले. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारताने २-० असा विजय मिळवला. त्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर या दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात भारताने २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
भारताविरूद्धच्या या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे टी २० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर यांच्यावर नाराज असलेल्या विंडिज क्रिकेट मंडळाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी संचालक मंडळाच्या बैठकीत पोलार्डच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यात ६ संचालकांनी पोलार्डच्या बाजूने मतदान केले तर ६ संचालक तटस्थ राहिले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.