*  विक्रमांना गवसणी घालणारे वासिम जाफरचे शानदार शतक
* मुंबईकडे १३९ धावांची आघाडी
वासिम जाफर गेली १६ वष्रे देशातील स्थानिक क्रिकेटमध्ये तेजाने तळपतो आहे. याच प्रखरतेमुळे ‘रणजीचा राजा’ हे बिरुद जाफरने रविवारी अभिमानाने मिरवले. रणजी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके हे दोन विक्रम त्याने पादाक्रांत केले. याचप्रमाणे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पाही त्याने ओलांडला. जाफरच्या ‘नवाबी’ शतकी खेळीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम फेरीच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ६ बाद २८७ अशी धावसंख्या उभारली. आता मुंबईने १३९ धावांची आघाडी घेतली असून विक्रमी चाळिसावे विजेतेपद आपल्या आवाक्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कौस्तुभ तरे आणि आदित्य तरे सकाळच्या सत्रात लवकर बाद झाल्यानंतर जाफरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. स्थानिक क्रिकेटमध्ये वर्षांनुवष्रे धावांचा पाऊस पाडणाऱ्या जाफरच्या खात्यावर रविवारी १०९व्या सामन्यात ३२वे शतक जमा झाले, पण ही खेळी जाफरसाठी खास होती. त्याने ८३ धावा करीत अमोल मुझुमदारचा रणजी क्रिकेट स्पध्रेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. मुझुमदारच्या नावावर १३१ सामन्यांत ९१०५ धावा जमा होत्या. याचप्रमाणे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १६ हजार धावांचा टप्पा पार केल्यानंतर जाफरला वेध लागले ते हंगामातील तिसऱ्या शतकाचे. धर्मेद्रसिंग जडेजाला एक्स्ट्रा कव्हरला चौकार ठोकून जाफरने आपल्या रणजी कारकीर्दीमधील ३२वे शतक साजरे केले आणि अजय जडेजाचा सर्वाधिक रणजी शतकांचा विक्रम मागे टाकला. त्यानंतर १०७ धावांवर असताना जाफरला यष्टिरक्षक सागर जोगियानी याने जीवदान दिले. मग जाफरने मनमुराद फटकेबाजी केली आणि क्रिकेटरसिकांना खूष केले.
जाफरने सचिनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची आणि अभिषेक नायरसोबत चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली. मग जडेजानेच जाफरला पायचीत केल्यानंतर सौराष्ट्रने सुटकेचा नि:श्वास सोडला. जाफरने सहा तास किल्ला लढवत २४६ चेंडूंत १६ चौकार आणि एका षटकारासह १३२ धावांची शानदार खेळी उभारली. मग उर्वरित षटकांमध्ये मुंबईची पडझड झाली. दिवसअखेर हिकेन शाहने (नाबाद ४१) धवल कुलकर्णीला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी रचून मुंबईचा डाव सावरला.
 संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र (पहिला डाव) : १४८
मुंबई (पहिला डाव) : ९४ षटकांत ६ बाद २८७ (वासिम जाफर १३२, सचिन तेंडुलकर २२, अभिषेक नायर २६, हिकेन शाह नाबाद ४१; धर्मेद्रसिंग जडेजा २/९६)
सचिन दुर्दैवीरीत्या धावचीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘विश्वविक्रमांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुनील गावस्करचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८१ शतकांचा विक्रम साद घालत आहे. सध्या सचिनच्या खात्यावर ८० शतके जमा आहेत, पण सचिन फक्त २२ धावांवर दुर्दैवीरीत्या धावचीत होऊन माघारी परतला आणि या विक्रमापासून तो वंचित राहिला. रविवारी वानखेडेवर आवर्जून हजेरी लावणाऱ्या क्रिकेटरसिकांना सचिनकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा होती. प्रारंभी सावधपणे खेळू पाहणाऱ्या सचिनला पहिली एकेरी धाव घेण्यासाठी १५व्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर जयदेव उनाडकटला लाँग ऑफला चौकार ठोकून सचिन खेळपट्टीवर स्थिरावला. जाफरसोबत चांगली भागीदारी जमविल्यानंतर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न सचिनसाठी धोकादायक ठरला आणि निराश अंत:करणाने तो माघारी परतला. स्वाभाविकपणे मुंबईकर क्रिकेटरसिकांचीसुद्धा निराशा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा