दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धचा पराभव विसरून नव्या उमेदीने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाशी लढत देण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघ उत्सुक झाला आहे. या दोन संघांमधील आयपीएल क्रिकेटचा सामना येथे रविवारी होणार आहे.

सनरायझर्सचा संघ साखळी गटात अव्वल स्थानावर आहे, मात्र दिल्ली संघाने त्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. बिंद्रा स्टेडियमवर हा सामना होणार असल्यामुळे पंजाबला घरच्या वातावरणात व अनुकूल खेळपट्टीवर खेळण्याचा लाभ मिळणार आहे. मात्र पंजाब संघास या स्पर्धेस सातत्याने संघर्ष करावा लागला आहे. मुरली विजय याच्याकडे कर्णधारपद दिल्यानंतर पंजाबच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. पंजाब संघ सातव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत अकरा सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. शुक्रवारी मुंबई इंडियन्सवर सहज मात केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. येथेही त्यांना विजय मिळविता आला तर त्यांच्या खेळाडूंसाठी हे प्रेरणादायक यश असेल.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सचे खेळाडू गोलंदाज व फलंदाज उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवीत आहेत. या स्पर्धेत वॉर्नर याने फलंदाजीत भरघोस कामगिरी केली आहे. त्याने अनेक वेळा संघास एकहाती विजय मिळवून दिला आहे. शिखर धवन यानेही भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्याबरोबरच केन विल्यमसन, दीपक हुडा व यष्टिरक्षक नमन ओझा यांच्यावरही त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. मात्र युवराजसिंग याने अपेक्षेइतके यश मिळविलेले नाही. गोलंदाजीत त्यांना भुवनेश्वरकुमार, आशिष नेहरा, मुस्ताफिझूर रहेमान व बरिंदर श्राण यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

पंजाबची गोलंदाजीची मदार प्रामुख्याने माकरेस स्टोईनीस याच्यावर आहे. त्याने मुंबईविरुद्ध केवळ १५ धावांमध्ये चार बळी मिळविले होते. याच सामन्यात मुरली विजय व वृद्धिमान साह यांनी शैलीदार अर्धशतके टोलवीत संघास सहज विजय मिळवून दिला होता. डेव्हिड मिलर व ग्लेन मॅक्सवेल यांचे अपयश ही त्यांच्यापुढील जटिल समस्या आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा व मोहित शर्मा हे द्रुतगती गोलंदाजीची बाजू सांभाळतील. स्टोईनीस याच्या जोडीला अक्षर पटेल याच्याकडूनही अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे.

Story img Loader