फुटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनीषा ऊर्फ किरण बावदनकरची कहाणी

स्वारगेट बस स्थानकावरील चार रात्री केलेला मुक्काम आठवला की अजूनही अंगावर काटे येतात. फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी गावापासून दूर येण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यामुळे हे कष्टप्रद दिवसही मला प्रेरणादायकच होते, असे फुटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनीषा ऊर्फ किरण बावदनकरने सांगितले.

मनीषा ही मूळची कोल्हापूर जिल्ह्य़ातील पाडळी बुद्रूक या खेडेगावातील रहिवासी. तिची आई व भाऊ शेतमजुरी करतात. आई काही वेळा अंगणवाडीमध्येही काम करीत असे. फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवण्याचे तिचे लहानपणापासूनच स्वप्न होते. मात्र तिला पालकांकडून फारसे प्रोत्साहन मिळाले नाही, तरीही कोल्हापूर येथील महावीर कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना तिने जिद्दीने फुटबॉल स्पर्धामध्ये भाग घेतला. तिने कनिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.

मुलींनी फुटबॉलमध्ये भाग घ्यावा असे तिच्या गावातील लोकांनाही वाटत नसे. त्यामुळेच की काय तिच्या या कारकीर्दीला खूप विरोध झाला. सरतेशेवटी जून २०१२ मध्ये तिने गावापासून दूर राहण्याचा व पुण्यात येऊन फुटबॉलमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचे अनेक खेळाडू सराव करीत असतात हे तिने ऐकले होते. पुण्यात आल्यानंतर तिने थेट हे मैदान गाठले. तिथे अतुल वाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सरावही सुरू केला. त्या वेळी निवास कोठे करायचा, हा तिच्यापुढे मोठा प्रश्न होता. चार रात्री तिने बस स्थानकावर काढल्या.

बस स्थानकावर राहताना काही भीती वाटली नाही काय, असे विचारले असता मनीषा म्हणाली, ‘‘गावातील लोकांच्या त्रासापेक्षा ही जागा मला सुरक्षित वाटली. या चार दिवसांनंतर मैदानाजवळ असलेल्या वसतिगृहात मी राहायला लागले. तेथे पैसे भरावे लागतात, हे मला माहीतच नव्हते. महाविद्यालयातील प्रा. राघव अष्टेकर यांनी माझी करुण कहाणी ऐकली. त्यांनी मला महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रवेश मिळवून दिला व वसतिगृहातही निवासाची व्यवस्था केली. मला शकुंतला अत्रे यांनी खूप आर्थिक पाठबळ दिले.’’

मनीषा पुढे म्हणाली, ‘‘महाविद्यालयीन शिक्षण घेताना मी आंतरविद्यापीठ स्पर्धेत पुणे संघाचेही प्रतिनिधित्व केले. पोलीस खात्याच्या भरतीसाठी मी प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये यश मिळाले नाही. त्यामुळे कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर मी आगाशे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. फुटबॉलमध्ये प्रशिक्षक होण्याचेही माझे ध्येय आहे. नुकताच मी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेला मूलभूत प्रशिक्षक अभ्यासक्रमही यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सध्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर १२ वर्षांखालील गटातील खेळाडूंना मी मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे माझ्या तंत्रातही सुधारणा होण्यास मदत होते. फुटबॉल व क्रीडा शिक्षक होण्याचे ध्येय मी साकार करीन अशी मला खात्री आहे.’’

Story img Loader