WPL 2023 Kiran Navgire: महिला प्रीमियर लीगमधील तिसरा सामना रविवारी खेळला गेला. हा सामना गुजरात जायंट्सविरुद्ध यूपी वारियर्स संघात पार पडला. या रोमहर्षक सामन्यात यूपी वारियर्स ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात किरण नवगिरे आणि ग्रेस हॅरिसने महत्वाची भूमिका बजावली. यानंतर किरण नवगिरे आणि तिचे बॅट चर्चेत आली आहे.
यूपी वॉरियर्स संघाकडून खेळणारी किरण नवगिरेही धोनीची मोठी फॅन आहे. त्यामुळे तिने आपल्या बॅटवर MSD 07 लिहले होते. महाराष्ट्रातील सोलापूर येथे जन्मलेल्या किरणला वॉरियर्सने तिची मूळ किंमत ३० लाख रुपये देऊन निवडले. पण रविवारी गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान किरन आणि तिची बॅट अचानक प्रकाशझोतात आली.
खरं तर, रविवारी गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात २७ वर्षीय किरणला यूपीकडून खेळण्याची संधी मिळाली. तिच्या बॅटवर प्रायोजकाचे नाव नव्हते. पण कॅमेऱ्याचा फोकस तिच्या बॅटजवळ गेल्यावर, तिथे MSD 07 लिहिले होते. किरण धोनीची खूप मोठी फॅन आहे, असे तिने यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चरवरही धोनीचा फोटो आहे.
महिला प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी जिओ सिनेमाशी संवाद साधताना किरण नवगिरे म्हणाली की, २०११ चा पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकताना पाहिले. महेंद्रसिंग धोनी हे संघातील मोठे नाव होते. किरणच्या म्हणण्यानुसार, ती २०११ पासून त्याला फॉलो करू लागली. त्यानंतर तिला माहित नव्हते की महिला क्रिकेट असे काही असते. किरण सांगते की ती तिच्या गावातील मुलांसोबत खेळायची, जे नंतर तिला आवडू लागले.
दुसरीकडे रविवारी गुजरातविरुद्धच्या सामन्यात किरण नवगिरेने अर्धशतक झळकावले. ग्रेस हॅरिसच्या झंझावाती खेळीपूर्वी तिने संघाची धुरा सांभाळली होती. यूपीच्या तीन विकेट २० धावांत पडल्या होत्या. यानंतर किरणने दीप्ती शर्मासोबत चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी पूर्ण केली. यादरम्यान तिने ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या.किरण नवगिरेन जेव्हा मैदानावर शानदार फलंदाजी करत होती, तेव्हा तिचे कुटुंब घरी मोबाईलवर तिला पाहत होते. घरातील सर्व लोकं मोबाईल तिच्या शानदार खेळीचा आनंद घेत होते.
यासोबतच किरणने भारतासाठी ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताच्या देशांतर्गत सीनियर महिला टी-२० ट्रॉफीमध्ये नागालँडकडून खेळताना तिने १६२ धावांची खेळी केली. जी टी-२० क्रिकेटमधील कोणत्याही महिला आणि पुरुषांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.