एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा चमकता तारा म्हणून बिरुद मिरवणाऱया ख्रिस केर्न्स या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूवर आपल्या उदरनिर्वाहासाठी साफसफाई करण्याची वेळ आली आहे.
आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ख्रिस केर्न्सला बस डेपोंची साफसफाईचे काम करावे लागत असल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे.
सामना निश्चितीच्या आरोपांवरून ब्रिटीश अधिकाऱयांमार्फत ख्रिसची चौकशी सुरू करण्यात आल्याने त्याच्यामागे कोर्ट-कचेऱयांचा ससेमिरा सुरू झाला. कोर्टकचेऱ्यांचा खर्च आणि बँक खाती गोठवण्यात आल्याने आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करतानाही ख्रिसच्या नाकी नऊ येत आहेत. ख्रिस सध्या ऑकलंड कौन्सिलमध्ये बस डेपोच्या साफसफाईचे काम करत असून या कामासाठी त्याला ताशी १७ डॉलर पगार मिळत आहे. त्यातूनच त्याच्या कुटुंबाला गुजारा करावा लागत असल्याची माहिती तेथील एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.
याबाबत बोलत असताना ख्रिसचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू डिऑन नॅश म्हणाला की, “ख्रिस सध्या भरपूर मेहनत घेऊन आपल्या कुटुंबाला सांभाळत आहे. समोर आलेल्या परिस्थितीपासून पळ न काढता तो मेहनतीने सर्वांचा सामना करत आहे. मी नेहमी त्याच्यासोबत आहे आणि एक चांगला मित्र म्हणून, त्याचे नाव सामना निश्चिती प्रकरणात गुंतले जाणे वेदना देणारे आहे. तो चॅम्पियन आहे आणि नक्की यासर्वांवर सामर्थ्यपणे मात करून तो बाहेर पडेल.” असेही डिऑन म्हणाला. दरम्यान, ख्रिस केर्न्सच्या पत्नीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घर चालविण्यासाठी ख्रिसला खूप कष्ट घ्यावे लागत असल्याचे तिने सांगितले. घराचे भाडे, दोन वेळचे जेवण आणि कोर्टाची बिले भरण्यासाठी ख्रिसला ही नोकरी करणे भाग पडत असल्याचे ती म्हणाली.
उदरनिर्वाहासाठी माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सवर बस डेपो साफ करण्याची पाळी!
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा चमकता तारा म्हणून बिरुद मिरवणाऱया ख्रिस केर्न्स या अष्टपैलू क्रिकेटपटूवर आपल्या उदरनिर्वाहासाठी साफसफाई करण्याची वेळ आली आहे.
First published on: 19-09-2014 at 06:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiwi all rounder chris cairns washes bus shelters to make ends meet