न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजांना हुडहुडी भरली, त्यामुळे धावा गोठल्या आणि दौऱ्याची सुरुवात पराभवाच्या शल्याने झाली. भारताकडून विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर पाय रोवता आले नाहीत आणि कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. न्यूझीलंडने दमदार कामगिरीच्या जोरावर भारतावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात २४ धावांनी विजय मिळवत विजयाची बोहनी करत मालिकेत आघाडी घेतली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कोरे अँडरसनला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
नाणेफक जिंकत भारताने न्यूझीलंडला फलंदाजीला पाचारण करत त्यांची २ बाद ३२ अशी अवस्था केली होती, पण त्यानंतर केन विल्यम्सन (७१) आणि रॉस टेलर (५५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले आणि स्थैर्य मिळवून दिले. हे दोघे बाद झाल्यावर अँडरसनने संघाला मोठी मजल मारून दिली. अँडरसनने ४० चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची खेळी साकारत संघाला २९२ धावांची मजल मारून दिली. मोहम्मद शामीने सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्माला (३) चेंडू सापडेनासा झाला होता. कोहली वगळता अन्य फलंदाजांनाही गोलंदाजीचा प्रखरपणे सामना करता आला नाही. कोहलीने मात्र गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत १११ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १२३ धावांची अप्रतिम खेळी साकारली, पण त्याची ही शतकी खेळी भारताला फळली नाही. न्यूझीलंडकडून मिचेल मॅक्लेघानने चार भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. कोरे अँडरसनने दोन तर टिम साऊदी, अॅडम मिलने आणि केन विल्यमसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
धावफलक
न्यूझीलंड :  मार्टिन गप्तील झे. अश्विन गो. शामी ८, जेसी रायडर त्रि. गो. शामी १८, केन विल्यमसन झे. रहाणे गो. जडेजा ७१, रॉस टेलर झे. धोनी गो. शामी ५५, ब्रेंडन मॅकक्युलम झे. धोनी गो. कुमार ३०, कोरे अँडरसन नाबाद ६८, ल्यूक राँची झे. कुमार गो. शर्मा ३०, नॅथन मॅकक्युलम झे. व गो. शामी २, टीम साऊथी नाबाद ३, अवांतर (लेग बाइज १, वाइड ६) ७, एकूण ५० षटकांत ७ बाद २९२.
बाद क्रम : १-२२, २-३२, ३-१५३, ४-१७१, ५-२१३, ६-२७९, ७-२८४.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-३८-१, मोहम्मद शामी ९-०-५५-४, इशांत शर्मा ९-०-७२-१, रवींद्र जडेजा ९-०-६१-१, आर. अश्विन १०-०-५२-०, विराट कोहली ३-०-१३-०.
भारत : रोहित शर्मा झे. साऊदी गो. मॅक्लेघान ३, शिखर धवन झे. टेलर गो. अँडरसन ३२, विराट कोहली झे. रायडर गो. मॅक्लेघान १२३, अजिंक्य रहाणे झे. नॅथन गो. अँडरसन ७, सुरेश रैना झे. साऊदी गो. मिलने १८, महेंद्रसिंग धोनी झे. राँची गो. मॅक्लेघान ४०, रवींद्र जडेजा झे. राँची गो. मॅक्लेघान ०, आर. अश्विन झे. साऊदी गो. विल्यमसन १२, भुवनेश्वर कुमार धावचीत ६, इशांत शर्मा त्रि. गो. साऊदी ५, मोहम्मद शामी नाबाद ७, अवांतर (लेग बाइज ३, वाइड १२): १५, एकूण ४८.४ षटकांत सर्व बाद २६८.
बाद क्रम : १-१५, २-७३, ३-८४, ४-१२९, ५-२२४, ६-२२४, ७-२३७, ८-२४४, ९-२५९, १०-२६८.
गोलंदाजी : टीन साऊदी ९.४-२-४३-१, मिचेल मॅक्लेघान १०-०-६८-४, अॅडम मिलने ७.३-०-४०-१, कोरे अँडरसन १०-०-५१-२, नॅथन मॅकक्युलम १०-०-५४-०, केन विल्यम्सन १.३-०-९-१.
सामनावीर : कोरे अँडरसन.

Story img Loader