विश्वचषकानंतर ज्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती त्या आयपीएल स्पर्धेच्या नव्या मोसमाला सुरुवात होणार आहे ती गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील बुधवारच्या सलामीच्या लढतीने. नव्या पर्वाची ही नवीन सुरुवात कशी होते आणि कोणता संघ विजयानिशी बोहनी करतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
कोलकाताच्या संघाने २०१२ आणि २०१४ साली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. यामध्ये संघातील फिरकीपटू सुनील नरिनचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे या मोसमापूर्वी नरिनच्या गोलंदाजी शैलीला मिळालेला हिरवा कंदील ही त्यांच्यासाठी आनंदाची आणि जमेची बाजू आहे. कोलकाताच्या रॉबिन उथप्पाने गेल्या वर्षी ६६० धावा करत ‘ऑरेंज कॅप’ मिळवली होती. कर्णधार गौतम गंभीरसारखा अनुभवी सलामीवीर त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर युसूफ पठाणसारखा तडाखेबंद फलंदाजही आहे. संघामध्ये अझर मेहमूद, ब्रॅड हॉगसारखे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत.
कोलकाताची गोलंदाजी अधिक भेदक दिसत आहे. मॉर्ने मॉर्केल, पॅट कमिन्स, आंद्रे रसेलसारखे वेगवान गोलंदाज संघात आहेत. नरिनला या वेळी पीयूष चावला किंवा जोहान बोथाची साथ मिळू शकते. त्याचबरोबर संघाने फार मोठी रक्कम खर्ची घालत के. सी. कैरप्पा या ‘चायनामन’ गोलंदाजाला संघात स्थान दिले असून त्याच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष असेल.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळल्यापासून संघाला चांगले दिवस आले असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेचे जेतेपदही पटकावले आहे. त्यामुळे या मोसमात त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. रोहितबरोबर किरॉन पोलार्डसारखा घाणाघाती फलंदाज संघात आहे. कोरे अँडरसनसारखा अष्टपैलू ही संघाची जमेची बाजू असेल.
अंबाती रायुडू आणि पार्थिव पटेल यांच्यावर मधल्या फळीची भिस्त असेल. श्रेयस गोपाळ, आदित्य तरे, सिद्धेश लाड या युवा फलंदाजांकडून कशी फलंदाजी होते, हे पहावे लागेल. गोलंदाजीमध्ये लसित मलिंगा, जोश हेझलवूड, मिचेल मॅक्लघनसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले गोलंदाज आहेत.
दोन्ही संघांचा विचार केल्यास मुंबईपेक्षा कोलकाताचा संघ किंचितसा वरचढ वाटत आहे, पण मुंबईच्या संघातील मुख्य खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची ताकद नक्कीच आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होईल, अशी आशा आहे.

कामगिरीत सातत्य हवे – गंभीर
कोलकाता : संथ खेळपट्टी बनवून कोलकाता नाइट रायडर्स जेतेपद पटकावते, असा खोडसाळपणाचा आरोप आमच्यावर केला जातो. पण संथ खेळपट्टी बनवून दोनदा जेतेपद पटकावता येत नाही. जेतेपद पटकावण्यासाठी खेळपट्टीपेक्षा कामगिरीतील सातत्य महत्त्वाचे असते, असे कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सुनील नरिन हा संघाचा अविभाज्य भाग आहे. नरिनच्या जागी दुसऱ्या फिरकीपटूचा आम्ही विचार करू शकत नाही. स्पर्धेच्या नवीन हंगामासाठी आम्ही सज्ज झालो असून जेतेपद कायम राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
गौतम गंभीर, कोलकाताचा कर्णधार

या मैदानातील आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक आहे, कारण या मैदानात आम्ही बरेच सामने जिंकले आहेत. स्पर्धेचा पहिला सामना नक्कीच महत्त्वाचा असतो. दोन्हीही संघ  तुल्यबळ असून सामना चांगलाच रंगतदार होईल, पण सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर मोसमाची चांगली सुरुवात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
रोहित शर्मा, मुंबईचा कर्णधार

प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), कोरे अँडरसन, एडन ब्लिझार्ड, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, र्मचट डि लॉन्ज, आरोन फिंच, श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, जोश हेझलवूड, सिद्धेश लाड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, अभिमन्यू मिथुन, प्रग्यान ओझा, हार्दिक पंडय़ा, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, नितीश राणा, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स, जगदीश सुचित, पवन सुन्याल, आदित्य तरे, विनय कुमार, अक्षय वाखरे.

कोलकाता नाइट रायडर्स- गौतम गंभीर (कर्णधार), अझर मेहमूद, जोहान बोथा, केसी करियप्पा, पीयूष चावला, पॅट कमिन्स, आदित्य गहरवाल, ब्रॅड हॉग, शेल्डॉन जॅक्सन, कुलदीप यादव, मॉर्ने मॉर्केल, सुनील नरिन, सुमीत नरवाल, मनीष पांडे, युसूफ पठाण, वीर प्रताप सिंग, वैभव रावळ, आंद्रे रसेल, शकीब अल हसन, रायन टेन डुस्काटा, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, ख्रिस लिन, जेम्स नीशाम.

Story img Loader