पंजाबवर सात धावांनी विजय; अव्वल स्थान पटकावले
भेदक गोलंदाजीच्या जोरावर आंद्रे रसेलने कोलकाता नाइट रायडर्सला एकहाती विजय मिळवून दिला. शतकी सलामीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रसेलने अचूक मारा करत पंजाबचे कंबरडे मोडले. त्याने चार बळी मिळवले आणि एका फलंदाजाला धावचीतही केले. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबला सात धावांनी पराभूत करत अव्वल स्थान पटकावले.
आंद्रे रसेल आणि मॉर्ने मॉर्केल यांनी तिखट मारा करत कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबची अवस्था ३ बाद १३ अशी दयनीय केली होती. रसेलने पहिल्या दोन षटकांत फक्त तीन धावा देत दोन बळी मिळवले होते. पण या दयनीय अवस्थेनंतर मैदानात दाखल झालेल्या ग्लेन मॅक्सवेलने कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेत सामन्याचा नूर पालटण्याचा प्रयत्न केला. आपल्या जोरकस फटक्याने मॅक्सवेलने कोलकात्याच्या गोलंदाजांना मैदानातील प्रत्येक कोपला दाखवला. पण सोळाव्या षटकात पियुष चावलाला रिव्हर्स स्विप मारण्याच्या नादात तो पायचीत झाला. मॅक्सवेलने ४२ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची दमदार खेळी साकारली. त्यानंतर रसेलने डेव्हिड मिलरचा काटा काढत संघाला विजयासमीप नेले होते. पण त्याच षटकात फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने (७ चेंडूंत २१धावा) दोन षटकार खेचत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण अखेर रसेलनेच शेवटच्या षटकात त्याला स्वत:च्या गोलंदाजी अप्रतिमपणे धावचीत करत कोलकात्याचा विजय सुकर केला.
तत्पूर्वी, पंजाबने नाणेफेक जिंकत कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि कर्णधार गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा यांनी १०१ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी हे दोघेही संयतपणे फलंदाजी करत होते. सुरुवातीला हे दोघेही चाचपडत खेळताना दिसत असले तरी स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी धावफलक हलता ठेवण्याची कामगिरी चोख बजावली.
उथप्पाने यावेळी ४९ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि २ षटाकारांच्या जोरावर ७० धावांची खेळी साकारली, तर गंभीरने ४५ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावांची खेळी करत उथप्पाला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर युसूफ पठाण (नाबाद १९) आणि रसेल (१६) ही गेल्या सामन्यात संघाला जिंकवून देणारी जोडी मैदानात होती. पण त्यांना गेल्या सामन्यासारखी झंझावाती फलंदाजी करता आली नाही. पंजाबच्या एकाही गोलंदाजाला यावेळी बळी मिळवण्यात अपयश आले. कारण कोलकात्याचे तिन्ही फलंदाज धावचीत झाले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : ३ बाद १६४ (रॉबिन उथप्पा ७०, गौतम गंभीर ५४; अक्षर पटेल ०/२४) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : ९ बाद १५७ (ग्लेन मॅक्सवेल ६८; आंद्रे रसेल ४/२०).
सामनावीर : आंद्रे रसेल.