Shreyas Iyer not retained for IPL 2025 by KKR : केकेआरने गुरुवारी आगामी आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. गेल्या हंगामातील चॅम्पियन केकेआर संघाचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर फ्रँचायझीपासून वेगळा झाला आहे. केकेआर संघाचे सीईओ वेंकी मैसूर यांनी याला दुजोरा दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या मागील संघातील ६ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी असेही सांगितले की श्रेयस अय्यर फ्रँचायझीच्या रिटेन करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता, परंतु चर्चेनंतर फ्रेंचायझी आणि कर्णधार यांच्यात कोणताही करार होऊ शकला नाही.
वेंकी म्हैसूरचा श्रेयस अय्यरबद्दल खुलासा –
रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना, कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले की, फ्रँचायझी श्रेयस अय्यरला संघात कायम ठेवू इच्छित होते, परंतु श्रेयसने स्वत: फ्रेंचायझीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. वेंकी म्हैसूर म्हणाले, “रिटेन्शनबाबत परस्पर सहमती आवश्यक आहे. हे एकतर्फी असत नाही. त्यामुळे फ्रँचायझीकडेच फक्त अधिकार नसतात, खेळाडूंनाही अनेक गोष्टी पहाव्या लागतात. विविध कारणांमुळे कधी कधी करार होत नाही. काही वेळा पैशामुळे खेळाडूंना लिलावात सहभागी व्हायचे असते.”
केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर काय म्हणाल?
वेंकी म्हैसूर पुढे म्हणाले, “या गोष्टींचा निर्णयावर परिणाम होतो, तो (श्रेयस अय्यर) आमच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. साहजिकच तो कर्णधार होता आणि आम्हाला त्याच्याभोवती संघ उभा करायचा होता. म्हणूनच आम्ही त्याची २०२२ मध्ये निवड केली होती. मात्र, २०२३ मध्ये त्याला दुखापत झाली होती, तेव्हा आम्ही त्याला सांगितले होते, जेव्हा कधी तू पुनरागमन करशील तेव्हा संघाचा कर्णधार असशील. यानंतर त्याने खूप चांगली कामगिरी केली. तसेच माझे त्याच्याशी चांगले नाते आहे. शेवटी लोक स्वतःचे निर्णय घेण्यासाठी मोकले असतात. ते काय करत आहेत हे त्यांना कळते. त्यामुळे आम्ही खेळाडूंना लिलावात जाऊन स्वतः पाहण्यासाठी पाठिंबा देतो.”
हेही वाचा – Sai Sudarshan : आयपीएलमध्ये रिटेन करताच साई सुदर्शनचा शतकी नजराणा, ऑस्ट्रेलियात साकारली दमदार खेळी
केकेआरचे सीईओ गुरुवारी म्हणाले, “ कोणताही विचार न करता राहिलेले १० किंवा ११ असतील. परंतु त्यापैकी ६ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेणे खूपच आव्हानात्मक होते. कारण ते अशा खेळाडूंबद्दल आहे, जे अनेक वर्षे संघाच्या संयोजनाचा भाग राहिले आहेत. त्याचबरोबर संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. सुनील १२ वर्षांपासून आमच्यासोबत आहे, तर आंद्रे १० वर्षांपासून आमच्यासोबत आहे. वरुण २०१९ पासून केकेआरशी जोडला गेला आहे आणि रिंकू देखील २०१९ पासून केकेआरचा भाग आहे. हर्षितही तीन वर्षांपासून संघात आहे, तर रमणदीप गेल्या वर्षी आला आणि त्याने खरोखरच शानदार कामगिरी केली. त्यामुळे मला वाटते की, हे एक चांगले संयोजन आहे.”