परिस्थिती कशीही असली तरी ज्याच्यामध्ये गुणवत्ता असते तो कशालाही घाबरत नसतो.. समोर कोणताही प्रतिस्पर्धी असो किंवा आयपीएलची अंतिम फेरी असो. प्रत्येक चेंडूगणिक उसासे सोडले जात होते..सामन्याची समीकरणे बदलत जात होती.. पुढच्या चेंडूमध्ये नक्की काय होणार, याची उत्सुकता प्रत्येक चेंडूगणिक वाढत जात होती.. एका आनंददायी क्रिकेट सामन्याची अनुभूती अवघ्या क्रिकेट विश्वाला येत होती.. जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर दोन्ही संघ झुलत होते.. अखेरच्या षटकापर्यंत जेतेपदाला गवसणी कोण घालणार, याचा अंदाज येत नव्हता.. चार चेंडूंमध्ये चार धावांची गरज असताना पीयूष चावलाने चौकार लगावल्याने कोलकात्याला सत्ताधीश होण्याचा मान मिळाला. यापूर्वी कोलकाताने २०१२ साली जेतेपद पटकावले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वृद्धिमान साहाने धडाकेबाज नाबाद झळकावल्यामुळे त्यांना कोलकाता नाइट रायडर्सपुढे २०० धावांचे आव्हान ठेवता आले होते. कोलकात्याच्या डावाची सुरुवात चांगली झाली नसली तरी मनीष पांडेने एक बाजू लावून धरत ९४ धावांची खेळी साकारत पंजाबच्या नाकीनऊ आणले होते आणि विजयाचा भक्कम पाया रचला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पीयूष चावलाने चौकार लगावत कळस चढवला आणि कोलकात्याने पंजाबवर तीन विकेट्सने विजय मिळवला.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने फॉर्मात असलेल्या रॉबिन उथप्पा (५) आणि कर्णधार गौतम गंभीरला (२३) या महत्वाच्या फलंदाजांना लवकर गमावले असले तरी ते प्रत्येक षटकांमागे दहा धावा जमवत होते. मनीष पांडेने पंजाबच्या गोलंदाजांवर आक्रमण करत पंजाबच्या नाकी नऊ आणले होते, युसूफ पठाणनेही (३६) त्याला चांगली साथ दिली. पण पठाण बाद झाल्यावरही पांडे एका बाजूने पंजाबच्या गोलंदाजीवर हल्ला चढवतच होता. पण दुसऱ्या टोकाकडमून त्याला अपेक्षित साथ मिळत नव्हती. यामध्येच मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली मौल्यवान विकेट गमावली. पांडेने ५० चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ९४ धावांची अफलातून खेळी साकारली. पांडे बाद झाल्यावर कोलकाता सामना गमावणार असे वाटत असले तरी, अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत चावलाने विजयाचा पताका फडकावला.
तत्पूर्वी, कोलाकाताने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि वृद्धिमान साहाच्या शतकाच्या जोरावर पंजाबने कोलकातापुढे २०० धावांचे आव्हान ठेवले. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी फॉर्मात असलेला वीरेंद्र सेहवाग (७) आणि कर्णधार जॉर्ज बेली (१) यांचे विकेट्स झटपट गमावले. पण त्यानंतर साहा आणि सलामीवीर मनन व्होरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ११ व्या षटकांपर्यंत या दोघांनी संयत खेळ करत ६७ धावा जमवल्या. पण त्यानंतर मात्र कोलकात्याच्या सर्व गोलंदाजांवर चौफर हल्ला चढवायला सुरुवात केली. कोलकात्याचा सर्वात फॉर्मात असलेल्या सुनील नरीनच्या चार षटकांमध्ये सर्वाधिक ४६ धावा लूटल्या. व्होराने ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही. नरीनच्या १९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत साहाने ९४ धावा पूर्ण केल्या, चौथ्या चेंडूवर चौकार लगावत तो ९८ धावांवर पोहोचला आणि पाचव्या चेंडूवर षटकार लगावत आयपीएल कारकिर्दीतीतले पहिले-वहिले शतक झळकावले. साहाने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ८ षटकारांची अतिषबाजी करत नाबाद ११५ धावांची अप्रतिम खेळी साकारली.
मनीष पांडे
धावा ९४
चेंडू ५०
चौकार ०७
षटकार ०६

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा