आयपीएलच्या १४व्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सशी कामगिरी चांगली झालेली नाही. काल (२४ एप्रिल) झालेल्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सने मात दिली. हा त्यांचा चौथा पराभव होता. फलंदाजीत सातत्याचा अभाव, हे कोलकाताच्या अपयशाचे कारण सांगितले जात आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला अपयशी ठरूनही अनेक संधी मिळाल्या, मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. असे असले तरी कोलकाताचा मेंटॉर डेव्हिड हसीने गिलला पाठिंबा दर्शवला आहे.
शुबमनने शेवटच्या ५ डावात १५, ३३, २१, ०, ११ अशा धावा केल्या. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गिलने पॉवरप्ले संपेपर्यंत फलंदाजी केली, मात्र, तो धावा करण्यात अपयशी ठरला. बॉर्डर-गावसकर मालिकेत त्याने केलेल्या कामगिरीच्या आधारावर हसीने त्यांला पाठिंबा दर्शवला आहे.
हसी म्हणाला, ”तो एक स्टार खेळाडू आहे, त्याने ऑस्ट्रेलियात वादळी फलंदाजी केली. शुबमन खूप विशिष्ट आहे आणि त्याच्याकडे एक उत्तम कार्यनिती आहे. मी एवढेच सांगू शकतो की फॉर्म येईल आणि जाईल, दर्जा नेहमी कायम असतो. माझे शब्द लक्षात ठेवा, स्पर्धेच्या अखेरीस तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल.”
राजस्थानची कोलकातावर सरशी
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या आयपीएलच्या १८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सला ६ गड्यांनी मात दिली. त्यामुळे कोलकाताला लीगमधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसच्या ४ बळींमुळे कोलकाताला २० षटकात ९ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मॉरिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे कोलकाताची गुणतालिकेत शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.