Gautam Gambhir has opened up about Mitchell Starc : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये खर्चून सर्वोच्च बोली लावण्याचा मान पटकावला. यानंतर केकेआर संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने मिचेल स्टार्कसाठी विक्रमी बोली लावण्याच्या त्याच्या फ्रँचायझीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तो म्हणाला, मिचेल स्टार्क ‘एक्स फॅक्टर’ असून गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्या दोन देशांतर्गत गोलंदाजांनाही खूप मदत करेल – गौतम गंभीर

केकेआर फ्रँचायझीचा मेंटॉर गंभीर देखील लिलावात उपस्थित होता, तो जिओ सिनेमाशी संवाद साधताना म्हणाला, “स्टार्क हा एक ‘एक्स फॅक्टर’ आहे, यात काही शंका नाही. तो नवीन चेंडूने गोलंदाजी करू शकतो, तो हाणामारीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्वही करू शकतो. आमच्या युवा भारतीय गोलंदाजांना स्टार्कचा अनुभव उपयोगी ठरेल. कारण आमचे दोन्ही गोलंदाज खूप प्रतिभावान आहेत. त्यांना मैदानावर मदत करण्यासाठी कोणीतरी हवे आहे आणि या सर्व भूमिकांमध्ये स्टार्क यशस्वी होईल.

इतर गोलंदाजांना मदत करेल –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “तो केवळ त्याच्या गोलंदाजीसाठीच नाही तर गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यासाठी देखील महत्त्वाचा असेल. ज्यामुळे इतर सर्व गोलंदाजांना मदत होईल. ” गौतम गंभीरने आपल्या आपल्या नेतृत्वाखाली केकेआरला दोन आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. तो म्हणाला की त्याच्या मते मजबूत फलंदाजीपेक्षा मजबूत गोलंदाजी लाइन-अप महत्त्वाची आहे.

हेही वाचा – Sports Awards 2023 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर! मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, सात्विक-चिरागला खेलरत्न

मजबूत गोलंदाजी आक्रमण हवे होते –

भारताचा माजी सलामीवीर म्हणाला, “आमच्या गोलंदाजीत खूप खोली आहे. आम्हाला नेहमीच एक मजबूत गोलंदाजी आक्रमण हवे होते आणि आता आमच्याकडे मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्कसह बरेच पर्याय आहेत. तसेच आमच्याकडे चेतन साकारियासह हर्षित राणा आणि सुयश शर्मा हे दोन भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे आमच्याकडे आता बरेच पर्याय आहेत. ज्यामुळे आम्ही खेळपट्टीनुरुप विविध योजना आखून मैदानात उतरू शकतो. मी नेहमी मजबूत बॅटिंग लाइन अपपेक्षा मजबूत बॉलिंग लाइन अपला प्राधान्य देतो.

हेही वाचा – IPL 2024 Auction : ‘CSK’ने ३० कोटींहून अधिक खर्च करून सहा खेळाडू केले खरेदी, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमकुवतपणा

विजयाची खात्री नाही पण खंबीरपणे उभे राहू –

गौतम गंभीरला २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपद मिळवून देणार्‍या फ्रँचायझीमध्ये परत येण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी केकेआर हा संघ नसून एक भावना आहे. यामागचे कारण म्हणजे मला कोलकात्यातील लोकांकडून सात वर्षांपासून अपार प्रेम मिळाले आहे. मला आशा आहे की आम्ही २०१२ आणि २०१४ मध्ये ज्या आठवणी निर्माण केल्या होत्या, त्याच आठवणी आम्ही पुन्हा निर्माण करू शकू. आम्ही जिंकू याची शाश्वती नाही, पण एक हमी आहे की आम्ही खंबीरपणे उभे राहू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr mentor gautam gambhir has opened up about mitchell starc spending the most money in ipl 2024 auction vbm
Show comments