स्पॉट-फिक्सिंगमुळे आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला काळिमा फासला गेला. हे प्रकरण थंडावत नाही तोच आता आयपीएलमधील उत्तेजक सेवनाच्या प्रकरणामुळे गुरुवारी क्रिकेटविश्वाला हादरविले आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा दिल्लीचा उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवान उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे.
आयपीएल क्रिकेटच्या इतिहासात उत्तेजक द्रव्य प्रकरणी दोषी सापडलेला सांगवान हा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफला उत्तेजक पदार्थ बाळगल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.
‘‘होय, आयपीएल क्रिकेट स्पध्रेत बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्यांचे सेवन केल्याप्रकरणी प्रदीप सांगवान दोषी आढळला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला  पत्र पाठवले आहे. सांगवानच्या ‘अ’ नमुन्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या पदार्थाचे प्रमाण आढळले आहे,’’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सांगवान याने बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन केले होते की कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजकांचा वापर केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘या प्रश्नाचे उत्तर सांगवानच्या ‘ब’ नमुन्याची चाचणी झाल्यावर मिळू शकेल. तथापि, बीसीसीआय या दोषी व्यक्तीवर कोणती कारवाई करेल, हे सांगता येणे कठीण आहे.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयची स्वतंत्र उत्तेजक विरोधी संस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अद्याप ‘वाडा’ (जागतिक उत्तेजक विरोधी संस्था) किंवा ‘नाडा’ (राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था) च्या अधिपत्याखाली येत नाही. त्यांची स्वतंत्र उत्तेजक विरोधी संस्था कार्यरत आहे. आयसीसीच्या क्रिकेट स्पध्रेप्रमाणेच आयपीएल स्पध्रेत सामन्याआधी किंवा नंतर खेळाडूंच्या क्रमरहित चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

कोण आहे प्रदीप सांगवान?
प्रदीप सांगवान हा दिल्लीचा २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज. वीरेंद्र सेहवागच्या नजफगढचाच हा रहिवासी. २००८मध्ये भारतीय संघाने युवा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. त्या संघात सांगवानचा समावेश होता. २००७पासून तो दिल्लीसाठी रणजी क्रिकेट खेळायला लागला. २००८ ते २०१० या काळात तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल खेळला. त्यानंतर २०११पासून सांगवानने कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३८ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १२३ बळी जमा आहेत. आयपीएलच्या सहाव्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरुद्धच्या सामन्यांत खेळू शकला होता. परंतु त्याला एकही बळी मिळाला नव्हता.

सांगवान उपचारासाठी ब्रिटनला
सांगवानला आयपीएल स्पध्रेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर उपचाराकरिता त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठविण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी सांगवान सध्या ब्रिटनला गेला आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देण्यासाठी तो उपलब्ध होऊ शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr seamer pradeep sangwan fails dope test in ipl