सलग सहा पराभव पत्करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला विजय अनिवार्य

ईडन गार्डन्सवर यजमान कोलकाता नाइट रायडर्सला नमवून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्याचा निर्धार मुंबई इंडियन्सने केला आहे.

शुक्रवारी मुंबई इंडियन्सने सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा ४६ धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला गवसलेला सूर ही मुंबईची जमेची बाजू ठरेल. त्याने यंदाच्या ‘आयपीएल’मधील पहिले अर्धशतक झळकावले.

मुंबई इंडियन्सला बाद फेरी गाठण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. कोलकाताविरुद्ध त्यांची विजय-पराजयाची आकडेवारी १८-५ अशी एकतर्फी आहे. याशिवाय सलग आठ सामन्यांत मुंबईकडून कोलकाताचा पराभव झाला आहे. कोलकाताने मुंबईविरुद्ध शेवटचा विजय चार वर्षांपूर्वी मिळवलेला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच हे दोन संघ आमनेसामने येत असून, उभय संघांमधील दुसऱ्या सामन्याने ५ मे या दिवशी साखळी सामन्यांना सांगता होईल.

कोलकाताने सलग सहा सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या घोडदौडीला खीळ बसली आहे. मागील सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकने ९७ धावांची सर्वोत्तम खेळी साकारून कोलकाताला १७६ धावांचे लक्ष्य उभारून दिले. परंतु राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी कोलकाताच्या वेगवान माऱ्याचा समाचार घेत हे आव्हान तीन गडी राखून पेलले. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांतील विजयासह नशिबाच्या बळावर कोलकाताला अजूनही बाद फेरीचे स्वप्न साकारता येऊ शकेल. रविवारी कोलकाताचा संघ घरच्या मैदानावरील अखेरचा सामना खेळणार असून, पराभवाची कोंडी  फोडून चाहत्यांना विजयाची भेट देण्यासाठी ते उत्सुक आहेत.