KL Rahul Angry on Virat Kohli Wicket: चॅम्पियन्स ट्रॉफीतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने भारतासाठी मॅचविनिंग खेळी खेळली, पण शतक झळकावण्यात तो अपयशी ठरला. भारताने सुरूवातीला दोन विकेट गमावल्यानंतर विराटने श्रेयसच्या साथीने भारताचा डाव सावरत उचलून धरला. विराटने या सामन्यात ८४ धावांची खेळी केली आणि त्याला ५२ वे वनडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो थोडक्यासाठी बाद झालाय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाला श्रेयस अय्यर आणि कोहलीच्या ९८ धावांच्या भागीदारीनंतर विराट-अक्षरची आणि विराट-राहुलच्या छोट्या भागीदारीने विजय निश्चित करून दिला. विराट कोहलीने आपल्या हुशारीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते आणि शतकापासून १६ धावा दूर होता. तितक्यात झाम्पाच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळत विराट कोहली बाद झाला.

भारताच्या डावातील ४३वे षटक टाकण्यासाठी एडम झाम्पा आला होता. राहुलने त्याच्या आधीच्या षटकात एक चौकार आणि झाम्पाच्या गोलंदाजीवर एक षटकार खेचून विराटवरील धावांचा भार कमी केला होता, जेणेकरून विराट आरामात त्याचे शतक पूर्ण करेल. पण विराट चौथ्या चेंडूवर चुकीचा फटका खेळत बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर राहुल वैतागला होता.

विराट बाद झालेलं पाहताच केएल राहुलने मान हलवत नाराजी व्यक्त केली. यानंतर तो कोहलीकडे पाहत म्हणाला, “मी मारत होता ना यार…’, राहुलच्या या सांगण्याचा अर्थ असा होता की, मी मोठे फटके मारत होतो तेव्हा तुला असे धोकादायक फटके खेळण्याची गरज नव्हती आणि तू आरामात खेळून तुझं शतक पूर्ण करू शकला असता. या सामन्यात कोहलीला त्याच्या जबरदस्त खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची ही पाचवी वेळ आहे. याआधी भारताने दोनदा हे विजेतेपद पटकावले होते. तर २०१७ मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.