KL Rahul Appointed Team India Vice Captain: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७वा सामना रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाला भारतीय संघात सामील करण्यात आले. यानंतर आता बीसीसीआयने यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची हार्दिक पांड्याच्या जागी उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
बांगलादेशविरुद्ध हार्दिकला झाली होती दुखापत –
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करता आले नाही. यानंतर, शनिवारी आयसीसीने जाहीर केले की हार्दिक पांड्या यापुढे विश्वचषकातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. तो बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. भारतीय संघ विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पोहोचला असून त्याचे अजून दोन साखळी सामने बाकी आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याचा समावेश आहे.
केएल राहुलकडे कर्णधारपदाचा अनुभव –
केएल राहुलकडेही संघाचे नेतृत्व करण्याचा बराच अनुभव आहे. राहुलने आतापर्यंत ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी संघाने ६ जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. याशिवाय केएल राहुलही या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ९७ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. तो सामना संघाला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर बांगलादेशविरुद्धही त्याने कोहलीच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी सकाळी केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. आतापर्यंत, केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये भाग घेत होता, आता उपकर्णधार म्हणून, गोलंदाज आणि फलंदाजीसह सर्व टीम मीटिंगचा भाग असणार आहे. संघ व्यवस्थापनही राहुलसोबत प्रत्येक विषयावर चर्चा करणार आहे.