2019 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड हा सध्या बीसीसीआयच्या निवड समितीसमोर कळीचा मुद्दा ठरतो आहे. पर्यायी सलामीवीर, पर्यायी जलदगती गोलंदाज कोणाला निवडायचं यावरुन अनेक मतमतांतर आहेत. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी भारतीय डावाची सुरुवात करेल ही गोष्ट जवळपास निश्चीत असली तरीही पर्यायी सलामीवीराच्या जागेचा प्रश्न अजुन कामय आहे. मध्यंतरीच्या काळात लोकेश राहुल हा पर्यायी सलामीवीर म्हणून समोर आला होता, मात्र गेल्या वर्षभरातल्या त्याच्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा द्यायची की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध सराव सामन्यात लोकेशने दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचं असल्यास राहुलकडे ही अखेरची संधी असल्याचं बोललं जातंय. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनीही विश्वचषकासाठी राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
“विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत पर्यायी सलामीवीर न घेता जाणं भारतीय संघाला परवडणारं नाही. याच कारणासाठी आम्ही लोकेश राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वन-डे मालिकेत भारतीय संघात जागा दिली आहे. तो या मालिकेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विश्वचषकाआधी राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं आहे.” Hotstar वर दिलेल्या मुलाखतीत प्रसाद बोलत होते.
अवश्य वाचा – विश्वचषकासाठी उमेश यादव योग्य पर्याय – आशिष नेहरा
काही दिवसांपूर्वी माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी लोकेश राहुलऐवजी दिनेश कार्तिकचा पर्यायी सलामीवीर म्हणून वापर व्हावा अशी मागणी केली होती. दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघामध्ये जागा दिलेली नाहीये. त्यामुळे या मालिकेत लोकेश राहुल कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेन वॉर्नच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला – कुलदीप यादव