केएल राहुल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. भारतीय क्रिकेटर जानेवारी २०२३ मध्ये अथिया शेट्टीशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. जानेवारी २०२३ मध्ये, उपकर्णधार केएल राहुलने वैयक्तिक कामासाठी बीसीसीआयकडून (BCCI) रजा घेतली आहे. त्यानी ही रजा त्यांच्या लग्नासाठी घेतल्याची शक्यता आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी अनेकदा एकमेकांच्या पोस्टखाली प्रेमळ कमेंट्स करण्यासाठी चर्चेत असतात.
अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी अथिया आणि राहुल नुकतेच पुढील वर्षी लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. लग्नाविषयी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला होता, “आशा आहे की, हे केव्हा आणि कुठे होईल हे लवकरच कळेल. मला वाटते योग्य वेळी सर्वांना कळेल.”
बीसीसीआयच्या एका सूत्राने पुष्टी केली आहे की, बोर्डाने केएल राहुलची ‘वैयक्तिक कामासाठी’ रजा मंजूर केली आहे. वैयक्तिक कामाचा खुलासा करण्यात आलेला नसला तरी, अथियासोबतच्या त्याच्या लग्नासाठीच ही रजा असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियात २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर उपकर्णधाराने स्वत:साठी ब्रेक घेतला होता. तसेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यावर उपस्थित नव्हता.
दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर त्याच्या लग्नाच्या बातमीची पुष्टी झाली, तर याचा अर्थ असा होईल की तो मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र ही मालिका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. केएल राहुल आणि अथिया शेट्टी २०१८ मध्ये डेट करू लागले. गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी आपले नाते गोपनीय ठेवले होते.
हे पॉवर कपल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या ‘जहाँ’ या बंगल्यात ते साध्या पारंपारिक पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती आहे. तारीख निश्चित झाली नसली तरी, राहुल आणि अथिया २०२३ मध्ये लग्नगाठ बांधणार हे निश्चित आहे.
त्यांच्या एका कॉमन फ्रेंडने इंडिया टुडेला सांगितले की, त्यांनी सर्व प्लॅनिंग अगदी गुपचूप ठेवले आहे आणि नेमक्या तारखा कोणालाच माहीत नाहीत. पण हे निश्चित आहे की, लग्न बहुधा जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. पण राहुलने जानेवारीतच सुटी घेतली असल्याने, तर जानेवारीतच लग्न ठरले आहे असा अर्थ काढला जात आहे.