वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवत मालिकेत २-० ने बाजी मारली. मात्र या विजयानंतरही भारतीय संघासमोरच्या समस्या काही कमी होत नाहीयेत. विंडीज दौऱ्यात गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली असली तरीही, सलामीवीर लोकेश राहुलला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कसोटी संघात लोकेश राहुलऐवजी रोहित शर्माला संधी देण्याची मागणी केली आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या आपल्या कॉलममध्ये गांगुलीने आपलं मत मांडलं आहे.

“सोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांमध्ये राहुल अपयशी ठरतो आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात राहुलने चार डावांत; ४४,४८,१३ आणि ६ अशा धावा काढल्या. आतापर्यंत राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये ३६ सामने खेळले असून त्याच्या नावावर २ हजार ६ धावा जमा आहेत. त्यामुळे राहुलला दिलेल्या संधीचा लाभ घेता आलेला नाहीये. यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने सलामीच्या जागेसाठी रोहित शर्माचा विचार करण्याची गरज आहे”, गांगुलीने आपलं परखड मत मांडलं.

सौरव गांगुलीने याआधीही रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला संधी द्यावी अशी मागणी केली होती. “विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला, मात्र काही बाबतींमध्ये संघाने सुधारणा करणं अपेक्षित होतं. सलामीच्या जोडीमध्ये मयांक अग्रवाल चांगला खेळ करतो आहे, त्याला आणखी काही संधी देण्याची गरज आहे. लोकेश राहुलने मात्र आपण सलामीवीर असल्याचं भासवत सर्वांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आता उघडा पडलाय.”

अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी यासारखे खेळाडू मधल्या फळीत असल्यामुळे रोहितला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळणं अशक्य आहे. विश्वचषकात रोहित चांगल्या फॉर्मात होता त्यामुळे त्याच्या या फॉर्मचा चांगला वापर करुन घेणं गरजेचं आहे, रोहितच्या सलामीच्या जागेसाठी सौरव गांगुलीने बॅटींग केली. दरम्यान विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यामुळे या मालिकेत लोकेश राहुल आपलं स्थान कायम राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader